कोंकणमहाराष्ट्र

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयांतर्गत कोकण रेल्वे मार्गावरील नवनिर्मित रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचे उद्घाटन

रत्नागिरी :  सद्यःस्थितीत रेल्वे कार्यक्षेत्रातील बदलत चाललेली परिस्थिती, रेल्वे विभागाकडून राबविण्यात येत असलेले सुधारणा प्रकल्प व त्यामुळे रेल्वे कार्यक्षेत्राच्या स्वरूपामध्ये होत असलेला बदल, दैनंदिन प्रवाशांची वाढत असलेली संख्या, गुन्हे, गुन्हेगारी व त्यावरील नियंत्रण, प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी व त्यांना होणाऱ्या गैरसोयी या सर्व बाबी लक्षात घेऊन, अपर पोलीस महासंचालक (नि. व. स), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी कोकण रेल्वेच्या हद्दीत सक्षम पोलीस यंत्रणा कार्यरत करण्यासाठी हार्बर लोहमार्ग परिमंडळ, कोकण लोहमार्ग विभाग व रोहा, रत्नागिरी व कणकवली या नवीन लोहमार्ग पोलीस ठाणे निर्मितीचा प्रस्ताव शासनास मान्यतेसाठी सादर केला होता.
उपरोक्त प्रस्तावाच्या अनुषंगाने कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी सुरक्षा, विभागाची मागणी, कोकण रेल्वे मार्गावरील भौगोलिक स्थान विचारात घेऊन, सध्या विभागाने प्रस्तावित केलेल्या पोलीस ठाण्यांपैकी रत्नागिरी येथे प्रथमतः पोलीस ठाणे निर्माण करण्यास महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय-पी.ओ.एस.-1122/ प्र.क्र.121/पोल-3, दिनांक ७ ऑगस्ट २०२४ अन्वये मान्यता मिळाली आहे.
आज (२५ ऑगस्ट) रोजी लोहमार्ग पोलीस महासंचालक (महाराष्ट्र राज्य, मुंबई)  बुरडे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन पार पडले.
याप्रसंगी पोलीस आयुक्त, लोहमार्ग (मुंबई) एम. राकेश कलासागर, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा, कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट, कोकण रेल्वेचे (बेलापूर) महानिरीक्षक, सह मुख्य सुरक्षा आयुक्त अभिषेक कुमार, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पश्चिम परिमंडळ (लोहमार्ग, मुंबई) पोलीस उप आयुक्त श्रीमती सुनिता साळुंखे- ठाकरे, मध्य परिमंडळ (लोहमार्ग, मुंबई) पोलीस उप आयुक्त श्रीमती प्रज्ञा जेडगे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे, सी.एस.एम.टी. विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर शिरसाठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (हार्बर विभाग, लोहमार्ग, मुंबई) श्रीमती निलीमा कुलकर्णी (बोरवणकर), बांद्रा विभाग (लोहमार्ग, मुंबई) सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर शिंदे, वाचक शाखेचे (लोहमार्ग, मुंबई) पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल, मानव संसाधन शाखेचे (लोहमार्ग, मुंबई) शहाजी निकम, पोलीस निरीक्षक, पोलीस महासंचालक (लोहमार्ग, महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांचे कार्यालय पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्यांची निर्मिती केंद्रीय रेल्वे, केंद्रीय रेल्वे सुरक्षा बल व जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या मदतीने करण्यात आली आहे. नवनिर्मित रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वाढ झाली असून सद्यस्थितीतील कार्यक्षेत्रासह सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासु, नागोठणे आणि रोहा ( पोलीस दूरक्षेत्र) या रल्वे स्थानकांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

ही रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाणे व पनवेल रेल्वे पोलीस ठाणे हे सहाय्यक पोलीस आयुक्त, हार्बर विभागांतर्गत समाविष्ट राहणार असून पोलीस उप आयुक्त, मध्य परिमंडळ यांच्या थेट नियंत्रणाखाली राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!