स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील; मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल!

मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत उपोषण सुरु केलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज (31 ऑगस्ट ) तिसरा दिवस आहे. याच दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत सुरु असणाऱ्या मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा, असं म्हणत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना एकप्रकारे कात्रीतच पकडलं आहे.
दुसरीकडे याच मुद्दयावर बोट ठेवत मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. स्वतःचं पोरगं निवडणुकी पाडलं. कधी पर्यंत भाजपची री ओढणार आहात? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील अशा शब्दात राज ठाकरेंच्या टीकेला मनोज जरांगेंनी सडेतोड प्रत्युत्तर देत टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

तुम्हाला आम्ही काही विचारलं का? मग तुम्ही आम्हाला का सल्ला देताय. तुम्ही भाजपकडे गेलात, आता पाठिंबा काढून घेतला. आम्ही 11 आमदार दिलेत तेव्हा आम्ही म्हटलं का बस्स झालं मराठवाड्यात कशाला येता? त्यामुळं तुम्हीही कशाला विचारता आम्हला. केव्हापर्यंत भाजपची री ओढणार. स्वतः ठाकरे ब्रँडचं अस्तित्व खराब करून घेताय. स्वतःचं पोरगं निवडणुकीत पडलं. तुम्ही हुशार राजकारणी, डोक्याने वागलं पाहिजे, नाही तर मुख्यमंत्री फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील.
कधीपर्यंत मुख्यमंत्री फडणवीसची री ओढणार, तुम्हाला संपून टाकतील ते. तुम्ही त्यांच्या घरी जेवलात म्हणजे तुमचा कार्यक्रम लागलाच म्हणून समजा. तुम्हाला वाटतं तुम्ही फार हुशार आहात. मात्र गरीब मराठ्यांना सगळं कळतं. निवडणुका लागल्या कि तुम्हाला जवळ धरतात मात्र देत काहीही नाही. खासरकी, आमदारकीच्या निवडणुका जवळ आल्या कि तुम्हाला जवळ धरतात आणि मतदान मिळालं कि दूर लोटून देतात. आता नगरपालिकेचा निवडणुका जवळ आल्यात. त्यात ठाकरे बंधूनी एकत्र कार्यक्रम घेतला तर ते भयाभीत झालेत. पुन्हा मुख्यमंत्री जवळ येत तुमच्या घरी जेवलेत म्हणजे तुम्ही झालेत खुश मात्र त्यामुळे गेला तुमचा पक्ष खड्डयात. अशी बोचरी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,
2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा….सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.
3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या… सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!