मनोज जरांगेंच्या राज ठाकरेंवरील टीकेनंतरही अमित ठाकरे मराठा आंदोलकांच्या मदतीला म्हणाले, “जेव्हा गरज पडेल…”

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत आहेत.
यादरम्यान हजारो मराठा बांधव देखील मुंबईत तळ ठोकून आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून, सुरूवातीचे काही दिवस त्यांची गैरसौय झाल्याचे दिसून आले होते. यादरम्यान आता मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मनसे कार्यकर्त्यांना मराठा आंदोलकांची मदत करावी असे आवाहन केले आहे.
अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुंबईत आलेले सर्व आपले बांधव आहेत आणि ते घरापासून दूर आंदोलन करत आहेत त्यांना काही कमी पडू नये ही जबाबदारी आपली आहे, असे मनसे कार्यकर्त्यांना सांगितले आहे. तसेच त्यांनी गरज पडेल तेव्ह त्यांना अन्न-पाणी, औषधोपचार आणि राहण्याची सोय पुरवली जावी असेही अमित ठाकरे म्हणाले आहेत.
अमित ठाकरेंची संपूर्ण पोस्ट
माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,
सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत.
हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत…. म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत.
ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करीत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे.
माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे.
*जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न पाणी पुरवा
*औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका
*त्यांच्या राहण्याची त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या
एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो एकटा आहे.
*लक्षात ठेवा ते आपलेच आहेत त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली तरी ते आपली जबाबदारी आहेत आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत.
*आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेने उभा राहील ही मला खात्री आहे.
जय महाराष्ट्र
जरांगेंची राज ठाकरेंवर टीका
मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात राज्यभरातून हजारो मराठा आंदोलक आले आहेत याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हे आंदोलन आता पुन्हा का आले असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारला जावा अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती यावर मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे यावेळी त्यांनी ठाकरे ब्रँड चांगला असल्याचेही म्हटले ते म्हणाले की दोघे ठाकरे भाऊ चांगले आहेत त्यांचा ठाकरे ब्रँड चांगला आहे असे समाजाचे म्हणणे आहे पण राज ठाकरे विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नात पडतात त्यांना काय आम्ही कधीही विचारलेले नाही तसेच जरांगेंनी राज ठाकरे हे कुचक्या कानाचे असल्याची ही टीकाही यावेळी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेण्याचा संदर्भातही जरांगे यांनी टीका केली होती तुम्ही 50 वेळा नाशिकला का येतात हे विचारले का? लोकसभेला फडणवीस यांनी तुमचा गेम केला त्यानंतर विधानसभेला तुमचा मुलगा पडला तरी तुम्ही त्यांचीच तळी उचलता फडणवीस तुमच्या घरी चहा पिऊन गेले तर तुमचा पक्ष बरबाद झाला तरी चालतो असे जरांगे पाटील म्हणाले.