युती असो किंवा नसो, भगवा फडकणारच – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी; जिल्ह्यात शिवसेना मजबूत आहे तरीही निवडणुकीत काळजीपूर्वक काम करणे आवश्यक आहे. आपल्याला सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकावयाचा आहे. युती असो नसो, भगवा फडकणार हे निश्चित आहे. जागा मर्यादीत आहेत, इच्छुक खूप आहेत. तिकीट देण्याचे सर्वाधिकार मुख्य नेत्यांना देण्यात आले आहेत…
ना. एकनाथ शिंदे देतील तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कामाला लागावे, अशी सूचना उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी केली. बुथप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. घरात बसून टीका करून पक्ष वाढत नाही, त्यासाठी कार्यकर्त्याच्या सुखदुःखात सहभागी व्हावे लागते.
निमंत्रण आले की लगेच एकनाथ शिंदे रत्नागिरी येतात. येताना भरीव निधी देऊन जातात. साडेतीन वर्षांच्या कालखंडात १८०० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला मिळाला. त्यातून शहरांचा कायापालट होत आहे. यापुढेही अतिरिक्त निधी देऊन जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली या शहरांचा सर्वांगीण विकास करण्याची घोषणा ना. उदय सामंत यांनी केली.
पावसाळ्यानंतर जिल्ह्यातील रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत. काही ठिकाणी कॉक्रीटीकरण तर काही ठिकाणी डांबरीकरण केले जाईल. भविष्यात रत्नागिरी जिल्हा खड्डेमुक्त असेल, असा विश्वास ना. सामंत यांनी व्यक्त करत बुथप्रमुखांनी सर्वांना सोबत घेऊन काम करावे, असे आवाहन ना. सामंत यांनी केले.