उत्तरप्रदेशात प्रियंका गांधी असणार मुख्यमंत्रिपदाचा चेहरा; स्वतः दिले संकेत- म्हणाल्या,…

उत्तर प्रदेश:- काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. यानंतर आता पाचही राज्यांमध्ये निवडणुकांचं वारं वाहू लागलंय. अशात काँग्रेसने देखील आपली कंबर कसली असून पाचही राज्यांमध्ये जोर लावायला सुरुवात केली आहे. दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र,आता याचं उत्तर समोर आलं आहे.
उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्रीपदासाठी माझ्या शिवाय दुसरा पर्याय आहे का? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्रीपदासाठी मीच दावेदार असल्याचे संकेत दिलेत. या संकेतांमुळे प्रियंका गांधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रियंका गांधी आता सक्रिय राजकारणामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार म्हणून प्रचार करताना पाहायला मिळतील.
प्रियंका गांधी या काँग्रेसचा नवीन तरुण चेहरा आहेत. यामुळे काँग्रेस बळकट करण्यात प्रियंका गांधी महत्त्वाच्या भूमिका बजावू शकतात. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये मतदार कोणाला कौल देताहेत हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.