कांदिवलीत भावसागर उसळला; संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्यात भक्ती-संगीताची मेजवानी

मुंबई: (महेश पावसकर)
कांदिवली पूर्व येथील संत श्री ज्ञानेश्वर चौक परिसर गेले तीन दिवस भक्तीरसाने न्हाऊन निघाला. ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्या’ निमित्त आयोजित भव्य भक्ती-संगीत कार्यक्रमात भाविकांची मोठी गर्दी उसळली. कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून संतचरणी वंदन केले.
तीन दिवस चाललेल्या या भव्य सोहळ्यात रांगोळीच्या माध्यमातून सजवलेले संतदर्शन, भजन स्पर्धा, सामूहिक पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन तसेच भक्ती संगीताचे विविध कार्यक्रम रंगले. हा सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा सांप्रदायिक संघ आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या संयुक्त विद्यमाने झाला.
“आपण सर्वांवर संतांची कृपाच आहे म्हणून एवढ्या मोठ्या आध्यात्मिक सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभले,” असे भावनिक उद्गार आमदार भातखळकर यांनी या प्रसंगी काढले.
कीर्तनकार ह. भ. प. तुकाराम महाराज गावडे यांच्या प्रभावी कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले.
भक्ती-संगीत कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांच्या सुरेख आवाजाने वातावरण अधिकच भक्तिमय झाले.

१५, १६ आणि १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सावित्रीबाई फुले मैदान, लोखंडवाला संकुल, कांदिवली (पूर्व) येथे आयोजित या आध्यात्मिक महोत्सवात भव्य दिंडी सोहळा, भजन स्पर्धा आणि संत-दर्शन रांगोळ्यांचेही विशेष आयोजन करण्यात आले होते.
या संपूर्ण सोहळ्यात श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा सांप्रदायिक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.





