राष्ट्रीयमहाराष्ट्रमुंबई

देशाच्या पंतप्रधानांना पराभवाची चाहूल – नाना पटोले

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पराभवाची चाहूल लागल्यानेच जाती व धर्माच्या नावाने मतांचा जोगवा मागत आहेत. जाती धर्माच्या उतरंडी ही मनुवादी भाजपाचीच संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीत जाती धर्माच्या नावावर माथी भडकावून राजकीय पोळी भाजण्याचा मोदी-शाह यांचा प्रयत्न महाराष्ट्रातील जनता खपून घेणार नाही, जाती जातीत भांडणे लावण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले असून नरेंद्र मोदींनी त्याचे खापर काँग्रेसवर फोडू नये. असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

भाजपाचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, राहुल गांधी हे लोकशाही व संविधान वाचवण्याची लढाई लढत असताना त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रकार हा संविधानाचा अपमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा व संविधानाचा अपमान भारतीय जनता पक्षाने सातत्याने केला आहे. लोकशाही व संविधान वाचवणाऱ्या लोकांना नक्षलवादी ठरवण्याचे पाप भाजपाने केले आहे. काँग्रेसने जाती जातीत भांडणे लावली, ओबीसींतील जातीत भांडणे लावली ओबीसींना आरक्षण दिले नाही या नरेंद्र मोदींच्या आरोपाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, ओबीसींना आरक्षण देणाऱ्या मंडल आयोगाला भारतीय जनता पक्षानेच तीव्र विरोध केला होता, हे देशातील जनतेला माहित आहे. दोन दिवसांपूर्वीच यवतमाळच्या वणी येथे भाजपच्या एका पदाधिका-याने कुणबी समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते पण कुणीही त्याला थांबवले नाही. ओबीसी समाजाबद्दल नरेंद्र मोदींनी दाखवलेला कळवळा हे फक्त ‘पुतणा मावशीचे प्रेम’, आहे.

काँग्रेस पक्ष आता राष्ट्रीय राहिला नसून प्रत्येक राज्यात दुसऱ्या पक्षांच्या कुबड्या घेत आहे हा नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत बालीश व हास्यास्पद आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकारच चंद्रबाबू नायडू व नितीशकुमार यांच्या कुबड्यावर उभे आहे. महाराष्ट्रातील सरकार बनवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून त्यांच्या कुबड्यावर सरकार बनवले, हे देशाच्या पंतप्रधानाना माहित नाही का? काँग्रेस संपली आहे असे म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींनी भाषणात ५० – ६० वेळा काँग्रेस नावाचा जप केला. नरेंद्र मोदींचे भाषण म्हणजे नेहमी प्रमाणे खोटे बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता पण महाराष्ट्राची जनता या भूलथापांना बळी पडणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.
ओबीसींचे राजकीय आरक्षण भाजपानेच घालवले. महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी, हलबा समाजामध्ये भाडंणे लावण्याचे पाप भाजापानेच केले आहे. सरकारी कंपन्या विकून नोकऱ्यातील आरक्षण संपवण्याचे पाप भाजपानेच केले आहे. युपीएससीची परीक्षा न घेता आरएसएसच्या विचारणीच्या तरुणांना थेट संयुक्त सचिव पदावर नियुक्ती देऊन एससी, एसटी, ओबीसी समाजाच्या मुलांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचे पाप मोदी सरकारनेच केले आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’, सारखी नारेबाजी करून महाराष्ट्रात धार्मिक उत्पात घडवायचा भाजपाचा प्रयत्न आहे. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाबद्दलची भाजपाची भूमिका पाहता भाजपा या समाजाला देशाचे नागरिक समजत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!