इस्रो पुन्हा घेणार चंद्राचा वेध, चांद्रयान-३ मोहिम ऑगस्ट महिन्यात

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आपल्या नवीन मोहिमांसाठी सज्ज झाली आहे. २०२२ या वर्षांमध्ये तब्बल १९ मोहिमा इस्रो हाती घेत आहे. या मोहिमांमधली महत्वकांशी आणि बहुचर्चित मोहीम म्हणजे चांद्रयान-३. येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये ही मोहीम प्रत्यक्षात उतरणार आहे.
२०१९ मध्ये सप्टेंबरमध्ये पार पडलेल्या चांद्रयान २ या मोहिमेत इस्रोने यशाचा ९० टक्के भाग पूर्ण केला होता. मात्र,चंद्राच्या दक्षिण भागात लँडर आणि रोव्हर पाठवण्यात इस्रोला काहीसं अपयश आलं. मात्र या अपयशातून शिकून, नवीन धडा घेऊन इस्रो आता चांद्रयान ३ साठी सज्ज झाली आहे.
यासंदर्भातील सविस्तर माहिती इसरो लवकरच माध्यमांना देणार आहे. ही मोहीम जरी जाहीर झाली असली तरी ही मोहीम यशस्वी होणारच यासाठी इस्रो पूर्णतः सकारात्मक आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगासह भारतीयांचं लक्ष इस्रोच्या चांद्रयान-३ या मोहिमेकडे आहे.