लता मंगेशकर स्मारक वाद तापला,भाजप काँग्रेसचा स्मारकाला पाठिंबा,तर प्रकाश आंबेडकर विरोध दर्शवत म्हणाले..

मुंबई:- गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं रविवारी सकाळी मुंबईत निधन झालं. लतादीदींच्या पार्थिवावर रविवारी दादरमधील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर भाजप नेते राम कदम यांनी लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्क येथे उभं राहावं, अशी मागणी केली. या मागणीला काँग्रेसनेही पाठिंबा दिला.दरम्यान शिवसेना यावर प्रतिक्रिया देत,लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून राजकारण करू नका असं मत व्यक्त केलं.
मात्र,दुसरीकडे भारिप बहुजन महासंघाचे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी या स्मारकाला विरोध दर्शवत,’ मुंबईत आधीच मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध नाहीत, अशा वेळी शिवाजी पार्क मैदानात स्मारक उभारणे चुकीचे ठरेल,अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
याचसोबत,’या स्मारकाला माझा विरोध आहे. शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहिलं पाहिजे. त्याला स्मशानभूमीमध्ये कनव्हर्ट करु नये या मताचा मी आहे. बाजूला एक स्मशानभूमी आहे ती चांगली मोठी आहे’, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.