कोरोनाचा निचांक; मुंबईत केवळ १९२ रूग्ण तर राज्यात फक्त १९६६ रूग्ण

मुंबई- महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख मागील काही दिवसांपासून उतरता असून आजतर नवीन आढळलेल्यांची रुग्णसंख्या थेट दोन हजारांच्या खाली पोहोचली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सोमवारी १ हजार ९६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांत राज्यात ११ हजार ४०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात सध्या ३६ हजार ४४७ ॲक्टिव रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७६,६१,०७७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६६ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज १२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर दुसरीकडे राज्यात आज ८ नवीन ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. हे आठही रुग्ण मुंबईत आढळले आहेत.
मुंबईमध्येही कोरोना रूग्णसंख्येचे दिलासादायक चित्र
मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत होणारी घट आजही कायम राहिली आहे. मुंबईत सोमवारी १९२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३५० जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट ९८ टक्के इतका झाला आहे.