
मुंबई:मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. गेले महिनाभर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवून चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे परशुराम घाट खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महामार्ग विभागाने या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी संरक्षक भिंत बांधण्यासाठी कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद नसल्याचे लेखी पत्राद्वारे परशुराम ग्रामस्थांना कळविले आहे. यामुढे पेढे व परशुराममधील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचे कारण नाही, संरक्षक भिंतीच्या कामासाठी अंदाजे दहा कोटी रूपयांची आवश्यकता आहे. अंदाजपत्रक तयार करा, सरकारकडून यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशा सूचना आपण स्वतः जिल्हाधिकार्यांसह संबंधित विभागाला तातडीने देऊ अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.