कर्नाटकात येडियुरप्पांसह 37 आमदार शिवसेनेत येणार होते पण बाळासाहेबांनी मैत्रीधर्म निभावला
विश्वनाथ नेरुरकर यांनी केला गौप्यस्फोट ; पाठीत खंजीर खुपसण्याची आमची औलाद नसल्याचे ठणकावून सांगितले

मुंबई- कर्नाटकात येडियुरप्पांसह भारतीय जनता पक्षाचे ३७ आमदार शिवसेनेत येणार होते. पण भारतीय जनता पक्ष हा शिवसेनेचा मित्रपक्ष आहे, कशाला मित्रपक्ष फोडता? असा सवाल करुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कर्नाटकात भारतीय जनता पक्षाची सत्ता वाचविली. दुसऱ्या बाजूला राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्खे भाऊ शिवसेनेत येणार होते, पण कशाला दुसऱ्याचे घर फोडायचे? असे सांगत महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विखे पाटील यांचे घर तुटण्यापासून वाचविले.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या मुशीतून तयार झालेले नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे. मित्रपक्ष किंवा कुणाचे घर फोडणारी आमची अवलाद नाही, अशा सणसणीत शब्दांत शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान नेतृत्वाला कानपिचक्या दिल्या. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य लिखित ‘आठवणीतले प्रबोधनकार’ या पुस्तकाचे ज्येष्ठ नागरिकांना तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र असलेले ‘मग’ युवा कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक वितरित करण्याचा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘भगवा सप्ताह’ या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शिवसेनेचे माजी उपविभाग प्रमुख मनोहर देसाई यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या शाखा क्रमांक चौदातर्फे बोरीवली पूर्व येथील गावकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
शिवसेना उपनेते, म्हाडा चे माजी सभापती विश्वनाथ नेरुरकर, विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, विधानसभा संघटक सुनील चव्हाण, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, उपविभाग प्रमुख चेतन कदम, शाखाप्रमुख अशोक परब, महिला शाखासंघटक कांचन सार्दळ, शिवचरित्राचे अभ्यासक राजू देसाई, समाजभूषण अशोक महादेव उर्फ दादासाहेब शिंदे आदि मान्यवरांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले. यावेळी बोलतांना विश्वनाथ नेरुरकर यांनी आपल्या घणाघाती भाषणात भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेची आणि विश्वासघातकी कारवायांची लक्तरे काढली.
मी कर्नाटकात संपर्क प्रमुख म्हणून काम करीत होतो. तिथे संघटना वाढविण्यासाठी आम्ही परीश्रम घेतले. प्रमोद मुतालिक आणि सहकारी यांच्या समवेत बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या कर्नाटक व्याप्त मराठी बहुल भागात संघटना बांधली. त्यावेळी बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह सदतीस आमदार शिवसेनेमध्ये येण्याच्या तयारीत होते. मी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना ही बाब सांगितली. तेंव्हा शिवसेनेची भारतीय जनता पक्षाच्या बरोबर युती असल्याने बाळासाहेब ठाकरे यांनी नको, मित्रपक्ष कशाला फोडायचा ? असे मला स्पष्टपणे सांगितले. शिवसेना कर्नाटकात भक्कम पणे काम करीत होती.
त्यामुळे एकवेळ भारतीय जनता पक्षाच्या हातून सत्ता जाऊ पहात होती. बाळासाहेबांनी भारतीय जनता पक्षाची सत्ता अबाधित ठेवली. असेच एकदा विजय मोरे या बेळगावच्या महापौरांना कन्नड रक्षण वेदिके या संघटनेच्या लोकांनी काळे फासले. तेंव्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक मातोश्रीवर आले. त्यांनी तक्रार केली. बाळासाहेब ठाकरे यांनी ठणकावून सांगितले की जर कर्नाटकात मराठी माणसाच्या केसाला जरी धक्का लागला तर मुंबई महाराष्ट्रातील कानडी माणसाला त्याचे परिणाम भोगावे लागतील.
मराठी माणसाबद्दलचे बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेम यातून दिसून येते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील झुंझार नेते प्रबोधनकार ठाकरे यांच्या मुशीतून तयार झालेल्या बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच हे करु शकते, असे विश्वनाथ नेरुरकर यांनी ठणकावून सांगितले. १९३७ साली प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या ‘प्रबोधन’ या वर्तमानपत्रात जी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसंबंधी भूमिका मांडली होती, तीच सर्वांना एकत्र आणण्याची शिवसेनेची भूमिका बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुढे कायम ठेवल्याचेही विश्वनाथ नेरुरकर यांनी आवर्जून सांगितले.
विजय वैद्य यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या सहवासात जे सुवर्ण क्षण प्राप्त केले तीच आपली खरी शिदोरी असल्याचे सांगून विलास पोतनीस आणि प्रकाश सुर्वे यांनी विजय वैद्य यांचा गौरव केला. कोरोनाच्या कालावधी नंतर एक चांगला कार्यक्रम घडवून आणला, त्याबद्दल मनोहर देसाई आणि अशोक परब यांना मान्यवरांनी शाबासकी दिली. विजय वैद्य यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या आठवणी सांगितल्या तर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी ‘आठवणीतले प्रबोधनकार’ या पुस्तकाचा प्रवास उलगडून सांगितला. याच कार्यक्रमात राष्ट्रपती पदक विजेते पोलिस अधिकारी जगदाळे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल आव्हाड यांचा आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर बाल जादूगार स्वानंद रणदिवे याचाही सत्कार करण्यात आला.