मुसळधार पावसाला तोंड द्यायला कोकण रेल्वे सज्ज: प्रशासनाचा दावा
मुंबई : पावसाळा सुरू होण्याआधीच कोकण रेल्वे प्रशासनाने मुसळधार पावसात उद्भवणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मार्गावरील संवेदनशील मार्गावर २४ तास गस्त घालण्यासाठी ६३६ प्रशिक्षित कर्मचारी तैनात केले आहेत. तसेच यंदाच्या भौगोलिक कामांकरिता ३४ कोटी रुपये खर्च केले आहेत.
नवी मुंबईतील कोकण रेल्वेच्या कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी यंदाच्या पावसाळ्यासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.
दरवर्षी कोकण रेल्वे मार्गावर पावसामुळे दरड कोसळणे, रुळांवर पाणी साचणे, पूलांवर ताण येणे, तसेच वान्याचा वेग अचानक वाढणे या समस्या उभ्या राहतात. यंदाही या सर्व बाबींचा विचार करून रेल्वे प्रशासनाने संपूर्ण पावसाळा काळ लक्षात घेता सुरक्षेची सर्वकष योजना आखली आहे.
यंदाच्या पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत करण्यात येणार आहे. या काळात हवामान खात्याशी रोजचा समन्वय साधला जाणार असून एका दिवसात १०० मिमीहून अधिक पाऊस झाल्यास रेल्वेसेवा तात्पुरती थांबविण्यात येणार आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे २४ तास कार्यरत राहणारे नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले आहेत. तसेच चिपळूण, रत्नागिरी,वेरणा,मडगाव, कारवार आणि उडपी येथे वैद्यकीय पथकेही सज्ज ठेवली आहेत.
मार्गावरील अतिसंवेदनशील भांगावर ३६५ प्रशिक्षित कर्मचारी दिवस-रात्र कामावर तैनात केले आहेत. याशिवाय
रत्नागिरी,चिपळूण, कणकवली आणि वेरणा येथे आपत्कालीन स्थितीत तत्काळ हस्तक्षेत करता यावा यासाठी खोदकामासाठी लागणारी यंत्रसामग्री सज्ज ठेवली आहे. रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये बिघाड झाल्यास माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कारवार आणि उडपी येथे टॉवर वॅगन्स सज्ज ठेवले आहेत.
पनवेल व्हायाडक्ट, मांडवी, झुआरी आणि शरावती हे कोकण रेल्वेमार्गावरील चार महत्त्वाचे पूल आहे. पावसाळ्यात या पूलावर वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ते अत्यंत संवेदनशील मानले जातात. याठिकाणी यंदा वाऱ्याचा वेग अचूकपणे मोजण्यासाठी अॅनिमोमीटर्स बसवले आहेत. वान्याचा वेग धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यास तात्काळ वाहतूक थांबविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन घेऊ शकते. यामुळे अपघात रोखण्यास मदत होणार आहे.