लता दिदींची प्रकृती खालावली,त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवल्याची रुग्णालयाची माहिती

मुंबई- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची तब्येत पुन्हा खालावली आहे. त्यांना मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.सध्या त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येत आहेत.
काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याचसोबत त्यांना न्यूमोनिया देखील झाला होता. यानंतर त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत होती. मात्र,आज सकाळी पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने आता त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलं आहे. काही वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली व लतादीदींच्या तब्येतीची डॉक्टरांशी विचारपूस केली.
दरम्यान पाच वाजता ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिन देत लता दीदी उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं सांगितलं आहे. आता लतादीदींचे सर्व चाहते त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करताना दिसून येत आहेत.