सिंधुदुर्ग सीईओ ने ग्रामविकास मंत्री यांचे आदेश धुडकावल्या प्रकरणी आज मंत्रालयात बैठक
मंत्री हसन मुश्रीफ संतप्त :मिरर महाराष्ट्राच्या वृत्ताची घेतली दखल

मुंबई:जि.प.कर्मचाऱ्यांच्या सेवामुक्तीला तसेच प्रशासन अधिकाऱ्यांच्या निलंबनाला स्थगिती आदेश दिल्यानंतरही ‘सीईओं ‘नी ते धुडकावल्यामुळे संतप्त झालेले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गंभीर दखल घेत आता या विषयावर आज मंत्रालयात अधिकृत बैठकच बोलावली आहे.
आज बुधवार दि.४ ऑगस्ट,२०२१,रोजी सकाळी ११.३० वा.त्यांच्या दालनात ही बैठक होणार आहे.
ग्रामविकास ‘मंत्र्यांचे आदेश ‘सीईओं ‘ नी धुडकवले ‘ या आशयाचे वृत्त ‘मिरर महाराष्ट्र’ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर मुश्रीफ यांनी या बातमीची गंभीर दखल घेत या विषयावर तातडीने बैठक बोलवा अशा सूचना ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांना दिल्या.त्यानुसार त्यांनी ही बैठक बोलावली आहे.
हे प्रकरण आता आणखी पेटले असून आयुक्त कार्यालय आणि जि. प.प्रशासनाच्या अडचणी त्यामुळे वाढल्या आहेत.
जि.प.चे ‘सीईओ ‘ ,आयुक्त कार्यालयाचे संबंधित अधिकारी,ग्रामविकास विभागाचे संबंधित उप-सचिव,सर्व संबंधित विभागांचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आदेशही देण्यात आले आहेत.लाड-पागे समितीच्या शिफारशी अंतर्गत ज्या ‘नियुक्त्या ‘ देण्यात आल्या आहेत त्याच्या सर्व फाईली,कागदपत्रे,चौकशी अहवाल ,तसेच या विषयावर एक सविस्तर टिप्पणी तयार करून बैठकीसमोर ठेवावी अशा सूचनाही विभागाला देण्यात आल्या आहेत.बैठकीला प्रधान सचिव हेसुद्धा उपस्थित रहाणार आहेत.
दरम्यान जि. प.च्या राज्य संघटनेने आज आक्रमक भूमिका घेत शासनाने या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करावा असे आवाहन ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांना एका निवेदनाद्वारे केले आहे.