ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात

सातारा:- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांची मुले दारु पितात असं वक्तव्य किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल साताऱ्यात केलं होतं.यानंतर बंडातात्यांच्या या वक्तव्याचा विविध स्तरातून निषेध करण्यात येत होता.यातच आता सातारा शहर पोलीसांनी बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतले आहे.
किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल केलेल्या आंदोलनाची आणि वक्तव्याची सातारा शहर पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.कराडकर यांना पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिस ठाणे परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान बंडातात्या यांनी काल सांयकाळी इंदापूर तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमानंतर आपल्या वक्तव्याबाबत माफीनामा सादर केला होता.बंडातात्यांनी संयमी भूमिका घेत माफी मागून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.मात्र, आज त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतल्यानं किर्तनकार बंडातात्या कराडकर यांचे समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे.