लोककला आणि नाटकावर सर्वंकष संशोधनाची गरज; सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलारांचे आवाहन

मुंबई प्रतिनिधी : मराठी नाटकाची पायाभरणी विष्णुदास भावे यांनी केली यात काही दुमत नाही. मात्र, लोककलांमधून उगम पावलेल्या नाटकाच्या मूळ संदर्भांवर आता लेखन व चर्चा सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एक सर्वंकष अभ्यास व सखोल संशोधनाची गरज असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी ठामपणे नमूद केले आहे. त्यांनी अखिल भारतीय नाट्य परिषदेने या कामात पुढाकार घ्यावा असे आवाहन केले आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त मुंबईत आयोजित नाट्य महोत्सवाचा समारोप आज मान्यवरांच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, भायखळा येथे संपन्न झाला. समारोप प्रसंगी नाट्य जागर मधील विजेत्या ०३ विशेष एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार आणि सचिव विकास खारगे यांची उपस्थिती असणे कार्यक्रमाची शोभा वाढवणारे ठरले.
मंत्री म्हणाले, “शंभराव्या नाट्य संमेलनानिमित्त विविध भाषांमधील नाटकांचा महोत्सव आयोजित करणे हा स्तुत्य उपक्रम आहे. विविध भाषांमधील विचार, नाटक, काव्य, कथा आणि सांस्कृतिक विविधता यांचे अदान प्रदान होणे अत्यंत आवश्यक आहे. मराठी भाषा नेहमीच इतर भाषांतील शब्द सामावून घेतच आली आहे आणि आपले मराठी नाटक शंभर वर्षांहून मोठी परंपरा असलेले आहे.”
त्यांनी असेही सांगितले की, आता नव्याने समोर येणाऱ्या लेखनातून असे संकेत मिळत आहेत की, लोककलांमध्ये नाटकाची मुळे आणि उगम असण्याची शक्यता आहे. म्हणूनच, अखिल भारतीय नाट्य परिषदेने एक अभ्यास गट स्थापन करून या विषयावर सखोल संशोधन करावे आणि सरकार या कामात पूर्ण मदत करेल, असे आश्वासन दिले गेले आहे.