दिव्यांगांच्या सेवेत समर्पित आयुष्य : सौ. सुधा वाघ यांचा प्रेरणादायी प्रवास

सौ. सुधा अनिलकुमार वाघ, गेल्या ४० वर्षांपासून दिव्यांग व्यक्ती आणि गरजू महिलांच्या सेवेत तन, मन, धन अर्पण करून कार्यरत आहेत. त्यांचे संपूर्ण जीवन समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी वाहून घेतले आहे. त्यांच्या समाजकार्याने हजारो दिव्यांग व्यक्तींचे जीवन अमूलाग्र बदलले आहे.
१९८९ साली श्री.विष्णू पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाताईंनी बोरिवली येथे अपंग-पुनर्वसन केंद्राची कार्य सांभाळायला सुरुवात केली. त्या काळात, मुलभूत सुविधांचा अभाव आणि सामाजिक समजुतींची कमतरता असताना, सुधाताईंनी अत्यंत खडतर परिस्थितीत हे केंद्र यशस्वीपणे चालवले. समाजातील दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, आरोग्य, रोजगार, आणि आत्मसन्मान यासाठी खऱ्या अर्थाने समर्पणाची शिकवण दिली आहे.
दिव्यांग मुलांना सामान्य शाळांमध्ये प्रवेश मिळवून देणे हे त्यावेळी मोठं आव्हान होतं. शाळा आणि शिक्षकांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना नाकारल्यावर, सुधाताईंनी स्वखर्चाने त्यांना शाळांपर्यंत नेण्याची जबाबदारी घेतली. जोगेश्वरी ते बोरीवली विभागातील अनेक शाळांनी सुधाताईंच्या प्रयत्नांमुळे दिव्यांग मुलांना शाळेत प्रवेश दिला. या मुलांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात आपले स्थान निर्माण केले.
सुधाताईंनी डॉ. अजय शेणवी यांच्यासारख्या तज्ञांच्या मदतीने अनेक दिव्यांग व्यक्तींना मोफत शस्त्रक्रियांच्या माध्यमातून चालण्याची नवी संधी मिळवून दिली. अपंगत्वाने ग्रासलेल्या लोकांना स्वतःच्या खांद्यावरून उचलून केंद्रात आणणे, त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यावर मोफत सर्जरी करून घेण्याचे अत्यंत मोलाचे कार्य सुधाताईंनी केले आहे. यामुळे, कित्येक लोक आज सन्मानाने स्वतःच्या पायावर उभे राहू शकले.
दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी देण्यासाठी सुधाताईंनी व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले. सुरुवातीला शालेय साहित्य आणि अगरबत्ती उत्पादनाद्वारे रोजगार मिळवून देण्यात आले. आज, हे लोक हँडपर्स, ट्रॅव्हलबॅग्स, लेडीज-पर्स अशा वस्तू तयार करून स्वतःच्या पायावर उभे आहेत. सुधाताईंच्या या प्रयत्नांमुळे दिव्यांग व्यक्तींना फक्त आर्थिक स्थैर्यच नव्हे, तर समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध कौशल्य विकास कार्यक्रम राबवले. त्यांनी स्नेहज्योतच्या माध्यमातून गरजू महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे. सुधाताईंनी अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली आहे. २०१५-१६ मध्ये सुरु केलेली ‘अमृतपुत्र शैक्षणिक दत्तक पाल्य योजना’ दिव्यांग व्यक्तींच्या मुलांना शैक्षणिक मदत मिळवून देण्याचे काम करते. या योजनेच्या माध्यमातून, दुर्बल आणि दुर्लक्षित कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी आर्थिक सहाय्य मिळवून दिले जाते. कोरोना काळात सुधाताईंनी जवळजवळ १०० पेक्षा अधिक कुटुंबांना दर महिन्याला जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरवली.
दिव्यांग व्यक्तींसाठी सुधाताईंनी दरवर्षी क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवातून, दिव्यांग खेळाडूंना पॅरा-स्पोर्ट्सच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती साधता येईल यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. या महोत्सवामुळे दिव्यांग व्यक्तींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सुधाताईंनी ३५ दिव्यांग महिलांना रिसॉर्टमध्ये पिकनिकला घेऊन जाणे, त्यांना स्विमिंग पूलचा आनंद देणे, तसेच ५० दिव्यांग व्यक्तींना मेट्रो प्रवासाचा अनुभव देऊन त्यांना नवीन जग दाखवले. हे त्यांचे धाडसी उपक्रम दिव्यांग व्यक्तींमध्ये आनंदाचे क्षण निर्माण करतात.
सुधाताईंच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख त्यांच्या वैयक्तिक मदतीतून समोर येते. त्यांनी अनेक गरजू दिव्यांग कुटुंबांना त्यांच्या अडचणीत मदत करून त्यांच्या समस्या सोडवल्या आहेत. संदीप आणि गायत्री जंगम या दिव्यांग जोडप्याला घर मिळवून देण्यापासून ते व्यवसाय उभारण्यासाठी सहकार्य करण्यापर्यंत, सुधाताई प्रत्येक अडचणीत त्यांच्या पाठीशी उभ्या राहतात.
सुधाताई याना अथर्व फाउंडेशन तर्फे ‘मोस्ट इन्स्पायरिंग लेडी ऑफ द इयर २०२२’, भारतीय शिक्षण मंडल एवं संस्कार भारती, कानपूर यांच्यातर्फे ‘सेवारत्न’, जे आय.एच, मुंबई मेट्रो तर्फे ‘नोबल सर्विस’ असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सुधाताईंचे कार्य म्हणजे समाजसेवेचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे अनेक दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने जगण्याची संधी मिळाली आहे, म्हणूनच त्या आधुनिक युगाच्या “नवदुर्गा” ठरतात.
लेखक : डॉ. गिरीश ब. महाजन