शाळेतल्या शिक्षकांना सर किंवा मॅडम म्हणायचं नाही,‘या’ राज्यातल्या शाळेचा अनोखा निर्णय

केरळ:- केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील एका शाळेने आपल्या विद्यार्थ्यांना एक अजब आदेश दिला आहे.तुमच्या शिक्षकांना सर किंवा मॅडम ऐवजी टिचर म्हणून संबोधित करा असे सांगितले आहे. ओलासेरी गावातील सरकारी अनुदानित सीनियर बेसिक स्कूल ही शिक्षकांना संबोधित करताना लिंग तटस्थता पाळणारी राज्यातील पहिली शाळा बनली आहे. ३०० विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेत नऊ महिला शिक्षक आणि आठ पुरुष शिक्षक आहेत.
केरळमधील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांसाठी लिंग-तटस्थ गणवेशाचा अवलंब केल्यावर हे आणखी एक पाऊल पुढे आले आहे. शाळेचे मुख्याध्यापक, वेणुगोपालन एच यांच्या म्हणण्यानुसार, ही कल्पना प्रथम एका पुरुष कर्मचारी सदस्याने मांडली होती.याच कल्पनेला सत्यात उतरवत पुरुष शिक्षक असो किंवा महिला शिक्षक या दोघांनाही टिचर बोलण्याचा आदेश या शाळेने विद्यार्थ्यांना दिला आहे.
या आदेशाचे अनुकरण इतर शाळांनीही करावे असे मत इथल्या शिक्षकांनी मांडले आहे.तसंच लिंगभेद टाळून सर्वांनी एकत्र आणि गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे हा संदेश त्यांनी यातून देण्याचा प्रयत्न केला आहे.