नितेश राणेंना त्यांच्याच घरात लपवलंय, शिवसेना आमदाराचा खळबळजनक दावा

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकी दरम्यान संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आमदार नितेश राणे अटकेच्या भीतीने गायब असल्याचे दिसून येत आहे. यावरुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. अशातच आता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे.
नितेश राणे यांना शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. मात्र, त्यांचे वडील नारायण राणे केंद्रिय मंत्री आहेत. केंद्रिय मंत्र्यांच्या घरीच नितेश राणेंना लपवून ठेवले असेल, अशी शक्यता आहे, असा थेट आरोप शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
दरम्यान, नितेश राणे यांच्यामुळे नारायण राणेही अडचणींत आले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच या प्रकरणी कोकणात शिवसैनिक सुद्धा आक्रमक झाले असून काही दिवसांपूर्वी पोलीस स्थानकावर मोर्चा काढून थेट आमदार नितेश राणे यांच्या अटकेची मागणी संबंधित पोलीस स्थानकात शिवसैनिकांनी केली होती. मात्र, अद्यापही नितेश राणे गायब असल्याचं दिसून येत आहे.