आरे कॉलनीतील प्रवास कोंडीत; खड्डे आणि रस्त्याच्या कामांमुळे वाहतूक मंदावली

मुंबई : आरेतील दिनकरराव देसाई मार्गावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. या मार्गावर केलेले खोदकाम आणि रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमुळे वाहनांचा प्रवास धिम्यागतीने सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास उशीर होत आहे.
आरे चेक नाका ते आरे युनिट क्र. ५ या भागात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. महापालिकेने या मुख्य रस्त्यावर गोरेगाव चेकनाका, युनिट क्र. २ येथे गेल्या ५ दिवसांपासून खोदकाम केले आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आरे यांनी
युनिट क्रमांक ३ येथे नाल्याचे बांधकाम सुरू केल्यामुळे तोही रस्ता बंद आहे. यामुळे आरेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास नाहक त्रास सहन करावा लागतो. याचा मोठा फटका विद्यार्थी तसेच रहिवाशांना बसत आहेत.
ऐन परीक्षेत फटका
एकीकडे बारावीच्या परीक्षा सुरू आहेत, तर काही दिवसांनी दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. अशात वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर व शाळेत पोहोचण्यास उशीर होत आहे.
नोकरदारांना कार्यालयात पोहोचण्याच विलंब
या मार्गावरून कामावर जाणाऱ्या नोकरदारांना कार्यालयात पोहोचण्यासाठी सुमारे एक ते दीड तास लागतो. पालिकेचा पी. दक्षिण विभाग आणि सार्वजनिक वाहतूक विभागाने रस्त्याची कामे पूर्ण करून आरेवासीयांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी, अशी मागणी नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी केली आहे. येथील साडेसात किलोमीटरचा दिनकरराव देसाई मार्ग निकृष्ट सिमेंटचा बनविण्यात आला. त्यामुळे पुन्हा रस्ता खोदून त्याची दुरुस्ती करण्यात येत असल्यामुळे येथे ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.