लतादीदी ऑक्सिजन सपोर्टवर, कुटुंबियांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई – भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त काल समोर आलं होतं. दरम्यान त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत.
लता मंगेशकरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेकजण त्या लवकर बरे व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीविषयी नातेवाईकांकडे चौकशीही केली आहे.अश्यातच सध्या त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत त्यांची भाची रचना शहा यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे.
रचना शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार,’लतादीदी यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. पण त्यांची प्रकृती आणि वय लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यावर डॉक्टरांची सर्वोत्कृष्ट टीम उपचार करत आहे. लतादीदी या सध्या ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे’.
समोर आलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना सध्यातरी कोणत्याही व्हेंटिलेटर सपोर्टची गरज नाही. लता मंगेशकर या ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील डी वॉर्डमध्ये दाखल आहेत. त्या वॉर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लता मंगेशकर या काही इतर काही वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आल्या होत्या. मात्र, उपचारादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.