चिपळुणकरांच्या मदतीसाठी चाकरमानी एकवटले..
राजापूर-लांजा नागरिक संघाकडे मदतीचा ओघ सुरू

मुंबई : कोकणातील चिपळूण शहरात पूराच्या पाण्यामुळे अनेकांचे संसार उद्बध्वस्त झाले आहेत. काहींची घरेच वाहून गेल्याने ते बेघर झाले आहेत. अंगावरच्या कपड्यांवर त्यांना घर सोडावे लागल्याने अन्न वस्त्रांची त्यांना गरज आहे. त्यांच्या मदतीसाठी मुंबईतील राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाने केलेल्या आवाहनानुसार चाकरमानी जमेल तशी मदत करीत आहेत. जास्तीत जास्त चाकरमान्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी केले आहे.
तात्काळ मदत करतांना मुंबईतून वस्तू घेऊन जाणे कठीण आहे. कारण आधीच मुंबई गोवा रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यात चिपळूणमधील वशिष्टी नदीवरचा अर्धा पूलच वाहून गेला असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. म्हणून संघाचे स्थानिक कार्यकर्ते आवश्यक त्या वस्तू स्थानिक बाजारात खरेदी करून त्यांचे वाटप पूरग्रस्तांना करणार आहेत, अशी माहिती संघाचे पदाधिकारी गणेश चव्हाण यांनी दिली.
आर्थिक स्वरुपात उभारण्यात येत असलेल्या या मदतीसाठी सोशल मिडियाचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी व्हॉट्स अॅप गृपही तयार करण्यात आले आहेत. शिवाय रोज ऑनलाईन मिटींग घेतल्या जात आहेत. चादर, बेडशीट, चटई अशी वस्तू रूपाने ही मोठ्या प्रमणात मदत गोळा होत आहे.