महाराष्ट्र

दुधातील भेसळीला आळा घालण्यासाठी लवकरच नवा कायदा !

राहाता : राज्यातील दुग्ध व्यवसायात भेसळीचे प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी दिवसेदिवस येत आहे. भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकासमंत्री अतुल सावे यांनी दिली. राज्यात दुधाला समान दर. एक राज्य एक ब्रँड, एक जिल्हा एक दूध संघ तसेच एक गाव एक दूध संस्था स्थापन करण्याबाबतची मागणी देखील काही दूध उत्पादकांकडून होत आहे. त्यावर शासन पातळीवर अभ्यास समिती नियुक्त करून सर्वानुमते निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोपरगाव येथील गोदावरी खोरे तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे यांच्या २१ व्या पुण्यस्मरण सोडव्यानिमित्त आज रविवारी दूध संघाच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या गौरवपत्र वितरण सोहळ्यात सावे बोलत होते. संघाचे अध्यक्ष राजेश परजणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, कैलास तांबे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, नाशिक दुग्ध विभागाचे विभागीय सहनिबंधक सी. एम. बारी, जिल्हा दुग्ध विभागाचे सहायक अभियंता टी. बी. भोजणे, जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. उमेश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, दूध उत्पादक संघाचे संचालक, कर्मचारी उपस्थित होते.दुग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांच्या जीवनात स्थिरता आणली आहे.

या व्यवसायाला जे संरक्षण हवे आहे ते अजून मिळत नसल्याच्या व्यावसायिकांच्या तक्रारी आहेत आणि त्या रास्ताही आहेत. सहकारी आणि खासगी अशी स्पर्धा निर्माण झाल्याने सहकारी दुग्ध व्यवसायाची गळचेपी झाल्याची वस्तुस्थिती आहे, अशी कबुली सावे यांनी दिली. शासन स्तरावर राज्यातील सर्व सहकारी दूध संघ व संस्थाच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करून अडचणी समजून घेऊन सर्वंकश तोडगा काढण्यात येणार असल्याचे सावे यांनी सांगितले. मंत्री विखे यांच्या कल्पकतेतून सुरू झालेली दूध उत्पादकांना दुधावर अनुदान देण्याची योजना तर अतिशय लक्षवेधी ठरली. त्यात तांत्रिक अडचणी आल्या. अनेक दूध उत्पादकांना अनुदान मिळाले नसल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्यात पण त्यावरही लवकरच तोडगा काढून दूध उत्पादकांना न्याय मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. संघाला सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या, स्वच्छ व उत्तम गुणप्रतीचा दूध पुरवठा करणाऱ्या, सर्वाधिक दर देणाऱ्या दूध संस्थांच्या प्रतिनिधींचा तसेच कृत्रिम गर्भधारणेचे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या कृत्रिमरेतन तज्ज्ञांचा यावेळी गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

अपघातामध्ये मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा रकमेच्या धनादेशाचे वितरणही यावेळी करण्यात आले. प्रास्ताविकात दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी दूध व्यवसायातील अडचणीबाबत अनेक विषय यावेळी मांडले. यावेळी डॉ. सुजय विखे यांचे भाषण झाले.चौकटशेती उत्पन्नात वाढ, शेतीतील पिकाची शाश्वती, शेतमालाला हमी भाव व योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी सर्वांनाच सोबत घेऊन शासन स्तरावर योग्य धोरण तयार करण्यात येईल. कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व प्रकारच्या सेवा शेतकऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच एक अॅप विकसित करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्याबरोबरच वेळेतही बचत होणार आहे. पीक नुकसानीचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पंचनामे करून पीक विम्याच्या अनुषंगाने अडचणी दूर करण्यात येतील. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!