ब्रेकिंग

काय स्वस्त,काय महाग? वाचा सविस्तर बजेट सोप्या भाषेत

नवी दिल्ली:- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प वाचून दाखवला. या अर्थसंकल्पात देशातील आर्थिक व्यवहारांसंदर्भातील काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.यंदा निर्मला सीतारामन यांचा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प पार पडला.या अर्थसंकल्पात देशातील महिला,शेतकरी वर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत.

दरम्यान,कोरोना काळ आणि महागाईने मेटाकुटीला आलेल्या करदात्या जनतेला करप्रणालीतून काहीसा दिलासा मिळेल असं वाटत असतानाच,यंदाच्या अर्थसंकल्पात कररचनेत कोणतेही बदल न झाल्याने पुन्हा एकदा कर दात्यांच्या पदरी निराश पडली आहे.गेल्या सहा वर्षांपासून कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

या वस्तू होणार स्वस्त:-
यंदाचा अर्थसंकल्पनुसार काही वस्तूंवरील कर कमी केल्यामुळे आता या वस्तू स्वस्त दरामध्ये ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.यामध्ये कापड, चामड्याच्या वस्तू, मोबाईल, फोन चार्जर, चप्पल आणि हिऱ्यांचे दागिने स्वस्त होणार आहेत. तसंच शेतीची साधनं आणि परदेशातून येणाऱ्या वस्तू स्वस्त होणार आहेत.

या गोष्टी महागणार:-
भांडवली वस्तूंवर ७.५ टक्के आयात शुल्क लावण्यात आला आहे. बाहेरच्या देशातून आयात कमी व्हावी यासाठी इमिटेशन ज्वेलरीवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. याचनुसार परदेशी बनावटीच्या छत्र्या महागणार आहेत.याचसोबत क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक देखील महागणार आहे.यानंतर परदेशातून आयात होणार वस्तूही महागणार आहेत.भांडवली वस्तूंवरील कर वाढल्याने कॅपिटल गुड्स वरील कर देखील वाढणार आहे.

अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय?
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात प्रत्येक राज्यांसाठी १ लाख कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. एक लाख कोटी ही रक्कम राज्यांच्या एकूण गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाणार आहे. हा निधी पुढील ५० वर्षांसाठी असेल यावर कुठलेही व्याज आकारले जाणार नाही. 

विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षण मिळावे यासाठी खास तरतूद
यंदाचं बजेट हे शेतकरी,महिला आणि विद्यार्थी वर्गासाठी महत्वाचं ठरणारं आहे.विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षण घरबसल्या घेता यावं यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना १०० टिव्ही चॅनेल्स प्रसारित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षण तुमच्या दारी या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना हे शिक्षण दिलं जाणार आहे.याचसोबत अंगणवाड्यांच्या सक्षमीकरणासाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे.

सर्व-सामन्यांसाठी महत्वाच्या घोषणा:-
१. ३.८ कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्य असल्याचे मत निर्मला सीतारामन यांनी मांडले आहे.

२.महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

३.बॅंकांमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा आता पोस्ट ऑफिस देणार आहे.

४.डिजिटल पेमेंट देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी केंद्र सरकार कंपन्यांना सहाय्य करणार आहे.

५.लघू आणि सुक्ष्म उद्योगांना 2 लाख कोटींचं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!