वाजपेयीजींना विसरून चोर दाराने उद्योग करायचा असेल तर ते योग्य नाही-नवाब मलिक

मुंबई:- हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते कोरोना संसर्ग आणि मुख्यामंत्र्यांच्या तब्येतीच्या मुद्द्यावरून मुंबईत होणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. दरम्यान, आता वाजपेयीजींना विसरून चोर दाराने कोणाला काही उद्योग करायचा असेल तर मला वाटते हे योग्य नाही, असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचा व्हिडीओ नवाब मलिक यांनी ट्विट केला असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’या देशामध्ये जेव्हा सरकार पाडण्याचा उद्योग वेगळ्या माध्यमातून होत होता त्यावेळी अटलबिहारी वाजपेयीजींची भूमिका होती की उघडपणे राज्यसभेचे मतदान व पारदर्शक पद्धतीने सगळा कारभार झाला पाहिजे. आता वाजपेयीजींना विसरून चोर दाराने कोणाला काही उद्योग करायचा असेल तर मला वाटते हे योग्य नाही’.
अधिवेशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधक मुख्यमंत्रिपदाबाबत अनेक सल्ले देत आहेत. या मुद्द्यावरुन भापने सत्ताधारी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या मुख्यमंत्री पदादाच्या त्या वक्तव्याने या टीकेला सुरूवात झाली असून त्यानंतर प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर अशा अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.