
मुंबई-आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपसह भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांवर गंभीर आरोप केले.या आरोपांनंतर आता भाजप कडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.पाहूयात काय म्हणतायेत भाजप नेते.
राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे, खोदा पहाड निकला चूहा-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला
गेले काही दिवस फार मोठे काही तरी प्रकरण बाहेर काढणार असे वातावरण निर्माण करून शिवसेना खा. संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली पण खोदा पहाड निकला चूहा असे झाले. असे नुसते आरोप करण्याने काही होत नाही. पुरावे असतील तर तपासी यंत्रणांना द्या आणि त्यांनी काम केले नाही तर न्यायालयात जा.असल्या पोकळ धमक्यांना कोणी घाबरत नाही, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केले.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, या पत्रकार परिषदेसाठी खूप वातावरणनिर्मिती केली, पण गर्जेल तो पडेल काय, असे झाले. एखादा माणूस अडचणीत आला की, थयथयाट करतो, तसा प्रकार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत दिसला.
ठाकरे सरकारने माझी व कुटुंबियांची जरूर चौकशी करावी-किरीट सोमय्या यांचे आव्हान
२०१७ मध्ये संजय राऊत संपादक असलेल्या सामना ने माझ्या पत्नीच्या नावाने असेच आरोप केले होते. आज त्याच बांधकाम व्यावसायिकाचे नाव घेऊन माझ्या मुलावर आरोप केले जात आहेत. या आरोपाबाबत ठाकरे सरकारने माझी जरूर चौकशी करावी , असे आव्हान भाजपा नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी दिले आहे.
डॉ. सोमय्या यांनी म्हटले आहे की , ठाकरे सरकारने माझ्याविरुद्ध आतापर्यंत १० गुन्हे दाखल केले आहेत, आणखी ३ दाखल होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता आणखी एका चौकशीस मी तयार आहे. खुशाल चौकशी करा. मी व माझ्या कुटुंबियांचा कोणत्याही भ्रष्ट , चुकीच्या व्यवहारात सहभाग नाही.
खा. संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत कोविड उपचार केंद्रातील गैरव्यवहाराबाबत मी केलेल्या आरोपांबाबत तसेच त्यांचे प्रवीण राऊत, सुजीत पाटकर यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत एक शब्दही उच्चारला नाही, याकडेही डॉ. सोमय्या यांनी लक्ष वेधले.