
मुंबई – मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या सहकार पॅनेलनं २१ जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, दुसरीकडे ज्या मजूर प्रवर्गातून दरेकर निवडून येतात त्यावर सहकार विभागाने आक्षेप घेत दरेकरांना ‘मजूर’ म्हणून अपात्र ठरवले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दरेकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
‘प्रवीण दरेकर यांना विरोधी पक्षनेतेपदी राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही, मुंबई बँकेच्या निवडणुकीमध्ये स्वतःला मजूर म्हणायचं आणि विधानपरिषद निवडणुकीच्या प्रतिज्ञा पत्रात स्वतःला उद्योजक म्हणायचं अशी धूळफेक फक्त भाजपचे नेतेच करू शकतात. राज्यातील भाजपचा एक जबाबदार नेता अशा प्रकारची धूळफेक करतो, तेव्हा भाजपची नैतिकता कुठे जाते?’, असा सवाल महेश तपासे यांनी केला आहे.
महाराष्ट्र सहकार विभागाने कारवाई करत प्रवीण दरेकर यांना अपात्र ठरवलं त्यामुळे या सर्व गोष्टी सर्वांच्या नजरेसमोर आल्या.परंतु आता लोकांची फसवणूक करणारे आणि खोटं सांगणारे प्रवीण दरेकर यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे. आता या टीकेला भाजपा काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.या मागणीनंतर प्रवीण दरेकर यांचं विरोधीपक्षनेते पद धोक्यात येण्याची चिन्ह आहेत.
प्रकरण नेमकं काय?
प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे २००० पासून संचालक होते. २०१० पासून अध्यक्ष आहेत. या घोटाळ्याप्रकरणी २०१५ मध्ये विवेकानंद गुप्ता यांच्या तक्रारीवरून प्रवीण दरेकर. शिवाजी नलावडे आणि राजा नलावडे यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. १९९८ पासून १२३ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं होतं. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर दरेकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.