भिवंडीत साकारले शिवाजी महाराजांचे सहा फूट उंच मूर्ती असलेले भव्य मंदीर…

भिवंडी : छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील भव्य असे मंदिर भिवंडीत साकारले आहे… भिवंडी-वाडा रस्त्यावरील मराडे पाडा इथं शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे भव्यदिव्य मंदिर साकारलं जातंय… तब्बल सात वर्षांपासून या मंदिराचं काम पूर्णत्वास आलं असून 17 मार्चला तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीला या मंदिराचं लोकार्पण होणार आहे… शिवभक्त राजू चौधरी यांच्या संकल्पनेतून चार एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आणि शिवजन्म ते शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जाज्वल्य देखावा उभारण्यात आलाय… अयोध्येतील रामलल्लाची मूर्ती घडविणारे अरुण योगी यांनी 6 फुटाच्या कृष्णशीला पाषाणातून शिवरायांची मूर्ती साकारलीय. हे मंदिर शिवप्रेमींसाठी तीर्थस्थळ बनणार आहे.
भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे भव्यदिव्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा 17 मार्च 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या निमित्ताने 14 ते 17 मार्च या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्यासह विविध मंत्री, आमदार, खासदार तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.