महाराष्ट्रमुंबई

फुले दाम्पत्यांना ‘भारतरत्न’ देण्याचा निर्णय पुरस्काराचा गौरव वाढवणारा- उपमुख्यमंत्री अजित पवार

देशवासियांच्या लोकभावनेचा आदर करणारा ठराव..

मुंबई : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करुन गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केलेला ठराव ऐतिहासिक असून प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा तसेच ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे.

संपूर्ण देशवासियांच्या लोकभावनेचा आदर करणारा हा ठराव सर्वांनुमते मंजूर होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व विधिमंडळ सदस्यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले आहेत. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरु करुन, स्त्रीशक्तीला शिक्षणाची दारे खुली करुन दिली. आज शेती, शिक्षण, ज्ञान, विज्ञान, संशोधन, अंतराळ, राजकारण, समाजकारण अशा सर्व क्षेत्रात महिला मोठ्या संख्येने जबाबदारीच्या पदांवर कार्यरत राहून देशाच्या विकासात आपले योगदान देत आहेत. याचे संपूर्ण श्रेय महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी त्या काळात दाखवलेल्या दूरदृष्टी, घेतलेल्या कष्टाला आहेत. समाजातील दुर्बल, वंचित, बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा नेण्यासाठी या दाम्‍पत्याने केलेले कार्य अलौकिक आहे. त्यामुळेच शेतकरी, कष्टकरी घटकांसह समस्त देशवासियांसाठी ते कायम ‘महात्मा’ राहणार आहेत. त्यांना ‘भारतरत्न’ देण्याचा महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला ठराव हा लोकभावनेचा आदर करणारा आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा ठराव आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!