आयुष्यात आपण परत कधीच भाजपमध्ये जाणार नाही..! -निलेश राणे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)-“आयुष्यात आपण परत कधीही भाजपामध्ये जाणार नाही, शेवटपर्यंत शिवसेनेतच रहाणार..,धनुष्यबाण हा शेवट…! ‘फूलस्टॉप ‘…!” ही मी तुम्हाला खात्री देतो’ असे कुडाळ – मालवणचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. हे मी तुम्हाला सांगतो आहे आणि राणेसाहेबांनाही सांगितले असेही निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
ओरोस येथे पक्ष बांधणी आणि पक्ष सदस्य नोंदणी कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात राणे बोलत होते. यावेळी पक्षाचे उपनेते संजय आंग्रे, सेना नेते संजय पडते, ओरोसचे उप-सरपंच पांडुरंग मालवणकर अन्य पदाधिकारी सेना कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
निलेश राणे हे परत भाजपामध्ये जाणार, इकडे तिकडे जाणार,अशा अफवा गेले काही दिवस माझ्या बद्दल पसरवल्या जात आहेत आणि म्हणून मी हा खुलासा करतो आहे असे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. आपला पक्ष, पक्षाचे चिन्ह आपल्याकडेच राहिलं पाहिजे, आणि ते रहाणारच आहे यात कोणतीच शंका नाही.मी शंभर टक्के खात्री देतो असे सांगून राणे म्हणाले की,आपला पक्ष आणि चिन्ह आपल्याकडून आता कोणीच घेऊ शकत नाही असे त्यानीं स्पष्ट केलं. जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढला पाहिजे आणि आपले नेते शिंदेसाहेब यांचीसूद्धा हीच अपेक्षा आहे. तेव्हा सर्वानी पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.
माजी मंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे पक्षाचे नेते आहेत हे लक्षात घेऊन पक्षाच्या सर्व कार्यालयात आणि बॅनर -पोस्टर्स वर यापुढे त्यांचे फोटो लागलेच पाहिजेत अशा सूचाना त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिल्या.