आमदार अपात्रता प्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, निकालाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष

मुंबई – शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर कोणाचा पक्ष खरा आणि कोणत्या आमदारांना अपात्र ठरवायचे, हा मुद्दा मंगळवार, २३ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात निकालात निघणार का, याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाला खरा पक्ष मानत कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही त्यांनी असाच निर्णय दिला. यावर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाने मागील सुनावणीत नार्वेकर यांच्याकडे संबंधित कागदपत्रे मागितली होती, ती आता २३ जुलै रोजी सादर होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाने देखील विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतली आहे.
त्यांच्या याचिकेनुसार, विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाला खरा पक्ष मानल्याने, ठाकरे गटातील १३ आमदारांना अपात्र ठरवायला हवे होते.महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असल्याने, हा निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरण आणि दोन्ही पक्ष नेमके कुणाचे यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.राजकीय तज्ज्ञांच्या मते, हा निकाल आगामी निवडणुकांवर मोठा परिणाम करू शकतो. त्यामुळे २३ जुलै रोजी सुप्रीम कोर्टाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.