सिंधुदुर्ग ठरला देशातला पहिला ‘ए -आय ‘युक्त जिल्हा…! नितेश राणे यांची घोषणा

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) – आजच्या महाराष्ट्र दिनाचे आणि सिंधुदुर्ग जिल्हा स्थापनेच्या दिवसाचे औचित्य साधत आजपासून जिल्ह्याच्या कारभारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए -आय )वापर करण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे मत्स्यविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राणे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.
प्रशासकीय कारभारात ‘ए-आय’ चा वापर करणारा सिंधुदुर्ग हा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे.
जिल्हा मुख्यालयातील शरद कृषी भवनात शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पत्रका रां च्या उपस्थितीत राणे यांनी ही महत्वापूर्ण घोषणा केली.
सद्याच्या बदलत्या युगात ‘ए-आय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जिल्ह्यात पारदर्शक, गतिमान आणि भ्रस्टाचारमुक्त कारभार केला जाईल अशी ग्वाही राणे यांनी यावेळी सिंधुदुर्ग वासियांना दिली. जगात प्रत्येक देशाचा विकास हा गतीने होत आहे. सिंधुदुर्गचा गतिमान विकास होण्यासाठी प्रत्येकाने ‘सिंधुदुर्ग फस्ट ‘हा विधायक दृष्टिकोन ठेवून शासन व प्रशासन यांच्या खांद्याला खांदा लावून काम करूया आणि जिल्हा सक्षम करूया असं कळकळीचं आवाहन राणे यांनी यावेळी केलं.
१९९९ साली सेना -भाजपा युती सरकारच्या कारकिर्दीत जिल्ह्याचे तेव्हा पालकमंत्री असलेले नारायण राणे यांच्या प्रयत्नाने सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा जाहीर झाला.आता त्यांचे चिरंजीव आणि विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने प्रशासनात आणि कारभारात ‘ ए-आय ‘ प्रणालीचा वापर करणारा देशातला पहिला जिल्हा ठरला आहे हे विशेष होय.
महाराष्ट्रात ए-आय हब व्हावं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न असून त्यादृष्टीने आवश्यक पावले टाकण्यास सुरुवात केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.त्यांच्या या विधायक भूमिकेला प्रतिसाद देऊन आम्हीही ‘मारवल’ कंपनीच्या सहाय्यानं हे पाऊल उचललं आहे असं राणे यांनी स्पष्ट केलं. या योजनेंतर्गत सुरुवातीला आरोग्य, वन,महसूल, पोलीस, परिवहन हे विभाग घेतले जाणार आहे आणि त्यानंतर इतर विभागांचा समावेश केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की,जिल्ह्याचा कारभार हाकताना रिक्त जागांमुळे असंख्य अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी आणि प्रशासनात गतिमानता येण्यासाठी या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.ही प्रणाली राबवल्यामुळे नोकऱ्या गमवाव्या लागणार हा जो गैरसमज पसरवला जात आहे तो निराधार आहे आणि या प्रणालीचा दुरुपयोग केला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
ही प्रणाली राबवण्यासाठी पालकमंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून ही समिती वेळोवेळी कामाकाजाचा आढावा घेणार आहे.सुरुवातीला अतिरिक्त पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले यांनी ‘ए-आय ‘प्रणाली म्हणजे काय..? त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करणार यावर सोप्या आणि सुंदर पद्धतीने सादरीकरण केलं.
पालकमंत्र्यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाला सर्वांनी सक्रीय साथ द्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले. या कार्यकमाला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,जिल्ह्यातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी, खातेप्रमुख,कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.