
मुंबई, दि.26 (महेश पावसकर) दक्षिण मुंबई ते उत्तर मुंबई या मार्गावर होणाऱ्या सर्वाधिक वाहतूक कोंडी पासून मुंबईकरांची सुटका करणारा मुम्बई महापालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट लवकरच पूर्णत्वास येणार असून येत्या नोव्हेंबर (२०२३) पर्यन्त या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होणार असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता मंथया स्वामी यांनी येथे दिली.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने या प्रकल्पाचा पाहणी दौरा आयोजीत करण्यात आला होता.या प्रसंगी पहिल्या टप्प्याचे 70% काम पूर्ण होत आले असून येत्या नोव्हेबरमध्ये या मार्गावरून वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता स्वामी यांनी दिली.
मुंबई च्या किनारपट्टीवर समुद्रात भराव घालून तयार होत असलेला हा मार्ग दोन टप्प्यात पूर्ण होणार असून, दुसऱ्या टप्प्यात वांद्रे ते वर्सोवा पर्यन्त हा मार्ग विस्तारित करण्यात येणार आहे.
मूळ जमिनीपासून सरासरी 90 मीटर इतका भराव समुद्रात टाकून हा मार्ग तयार करण्यात येत आहे.नवी मुंबई विमानतळासाठी फोडण्यात आलेल्या डोंगराची माती,दगड आदींचा भराव या साठी वापरण्यात आला आहे.दक्षिण मुंबईतील अमरसन्स , हाजी अली,आणि वरळी येथून या मार्गावर थेट येण्यासाठी येथे आंतरबदल पूल उभारण्यात येत आहेत.या पुलां पैकी सर्वात उंच पूल हाजी अली येथे असून त्याची उंची सर्वाधिक म्हणजे तब्बल 30 मीटर इतकी आहे.
मरीन लाइन्स उड्डाण पुला पासून सुरू होणारा हा मार्ग वरळी- वांद्रे सी लिंक ला जोडण्यात येणार आहे.गिरगाव चौपाटी तसेच मलबार हील येथे जमिनीखालून बोगदे खणण्यात आले असून या बोगद्यांची लांबी 2 किमी इतकी आहे. दक्षिण ते उत्तर व उत्तर ते दक्षिण वाहतुकीसाठी दोन स्वतंत्र बोगदे बांधण्यात आले आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी ‘मावळा’ या भारतातील सर्वात मोठ्या म्हणजे तब्बल 11 मीटर व्यासाच्या टीबिएम मशीन चा वापर करण्यात आला आहे.
या बोगद्यात अपघात झाल्यास, आग लागल्यास अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा तयार करण्यात आली असून सकर्डो पद्धतीची वायुविजन असलेली नवीनतम यंत्रणा विकसित करण्यात आली आहे, ज्यामुळे हवेचा दाब वाहनांच्या जाण्याच्या दिशेने हवेचे झोत कार्यरत होऊन वाहतुकीस बाधा उत्पन्न होणार नसल्याचे सांगितले गेले.
या संपूर्ण मार्गावर 4 पार्किंग झोन उभारण्यात येत असून त्यांची सुमारे 1800 वाहने उभी करण्याची क्षमता
असणार आहे.एकूण 10 किमी असलेल्या या रस्त्यावर 16 अंडरपास असून ठिकठिकाणी लोकांना चालण्यासाठी विशेष ट्रॅक,सायकल ट्रॅक,योगा पार्क,थीम गार्डन, तसेच मलबार हील ते वरळी सी फेस पर्यंत तब्बल सात किमी लांबी असलेला अत्यंत आकर्षक असा समुद्र किनारा लाभणार आहे. या संपूर्ण मार्गावर सी सी टिव्ही यंत्रणेद्वारे लक्ष ठेवण्यात येणार असून संपूर्ण मार्गावर आकर्षक अशी विद्युत प्रकाश योजना करण्यात येणार असल्याने मुंबई च्या सौंदर्यात भर पडणार आहे.
सुमारे साडे बारा हजार कोटी रु.खर्चून तयार होत असलेल्या या कोस्टल मार्गा मुळे मुंबई करांची मोठ्या वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्याबरोबरच मुम्बई च्या पर्यटन स्थळांच्या यादीत या नव्या मार्गाची भर पडणार असून हा मार्ग पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल असा विश्वास महापालिकेकडून देण्यात आला आहे.