संतोष देशमुख प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा – विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई प्रतिनिधी: संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी त्याने हा प्रश्न सुटणार नाही. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. बीडमध्ये अनेक गंभीर गुन्हे घडले आहेत, खंडणी आणि खुनाच्या घटना समोर आल्या आहेत. मुंडे यांना सहआरोपी केल्यास अशा अनेक गुन्ह्यांचा उलगडा होईल, असा दावा त्यांनी केला.
“महाराष्ट्र बिहारच्या पुढे गेला आहे का?” असा सवाल करत, वडेट्टीवार यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महायुती सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे उघड होत असून, पश्चिम महाराष्ट्रातील एका पैलवान मंत्र्याने एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्या मंत्र्यावर शिक्षा होऊनही तो केवळ दहा हजार रुपये दंड भरून मोकळा झाला आणि पुन्हा त्या महिलेच्या मागे लागला. महिलेला ब्लॅकमेल करण्यात आले. जर भाजपच्या मंत्र्यांचे वर्तन असे असेल, तर राज्यातील महिलांचे संरक्षण कसे होणार? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
तसेच, उत्तर महाराष्ट्रातील एका मंत्र्याने राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची २६ एकर जमीन बळकावल्याचा आरोपही त्यांनी केला. “या मंत्र्यांनी काळे धंदे सुरू केले असून, त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे उघड केले.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या पक्षांतराच्या चर्चांवर उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, “मी पुरोगामी विचारधारेशी जोडलेलो आहे. काँग्रेसचा निष्ठावान शिपाई आहे. सत्ता मिळो वा न मिळो, मी पक्षाशी एकनिष्ठ राहणार. जातीयवादी शक्तींसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझ्याबाबत अफवा पसरवली जात आहे.” असे त्यांनी स्पष्ट केले.