मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ठाम भूमिका

मुंबई प्रतिनिधी: राज्यात मराठी भाषेवरून पुन्हा एकदा जोरदार राजकीय वातावरण तापले आहे. विधानसभेत मराठीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, “मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. राज्यातील प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे. आम्ही इतर भाषांचा सन्मान करतो, पण ज्याला आपल्या भाषेवर प्रेम असते तोच इतर भाषांचाही सन्मान करतो,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
विधानसभेत मराठीवरून गदारोळ
रा. स्व. संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश (भय्याजी) जोशी यांच्या मराठीवरील वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यात यावरून जोरदार खडाजंगी झाली. भाजप आणि ठाकरे गटाचे सदस्य एकमेकांसमोर आले. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले.
भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरून वाद
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. “मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र, भय्याजी जोशी यांनी घाटकोपरमध्ये गुजराती समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तिथे गुजराती भाषा बोलली गेली तरी हरकत नाही, असे विधान केले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, “मी स्वतः भय्याजी जोशी काय म्हणाले ते ऐकलेले नाही. मात्र, सरकारची भूमिका स्पष्ट आहे—मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच राहील. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे आणि बोलता आली पाहिजे. मात्र, आम्ही इतर भाषांचाही सन्मान करतो.”
आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांच्यात जोरदार खडाजंगी
मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर आदित्य ठाकरे बोलण्यासाठी उभे राहिले, मात्र भाजप सदस्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. “मुख्यमंत्री यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, आता पुढील कामकाज सुरू होऊ द्या,” असा आग्रह भाजप आमदार नितेश राणे यांनी धरला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “मी फक्त आभार मानायला उभा राहिलो आहे.”
मात्र, यावरून ठाकरे आणि राणे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. ठाकरे गटाच्या मदतीला वरुण सरदेसाई आणि इतर आमदार धावून आले, तर भाजपकडून नितेश राणे, आशिष शेलार आणि योगेश सागर आक्रमक झाले. दोन्ही बाजूंकडून जोरदार गोंधळ सुरू झाला. अखेर, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाच मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.
मराठीचा मुद्दा राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू
मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा वारंवार राजकीय वादाचा विषय ठरतो. यावेळीही विधानसभेत या मुद्द्यावरून मोठा वाद झाला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कोणते ठोस निर्णय घेतले जातील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.