महाराष्ट्रमुंबईवाहतूक

गोर-गरीब जनतेला धार्मिक पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी एसटी सोबत खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सामिल व्हावे..! – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबईसर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित करव्यात जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येईल, या योजनेत राज्यातील सर्व टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. ते या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या मुख्यालयात बोलावलेल्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर,सर्व खाते प्रमुख यांच्या सह खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यातील गोर- गरीब जनतेला धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या माध्यमातून कमी गर्दीच्या दिवसात सहलीचे आयोजन करावे. यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक पर्यटकांना स्वच्छतागृह व निवास व्यवस्था (जिथे उपलब्ध असेल तिथे) निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येईल.

मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, कमी गर्दीच्या हंगामामध्ये विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी एसटीला प्रवासी भारमान कमी असते. त्यामुळे उत्पन्न कमी मिळते. अशावेळी एसटीने खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी धार्मिक पर्यटन स्थळी सहली आयोजित केल्यास त्यातून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढेल, तसेच सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरात पर्यटनचा आनंद लुटता येईल.

त्या अनुषंगाने खाजगी टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कमी गर्दीच्या दिवशी पर्यटकांच्या मागणीनुसार अष्टविनायक दर्शन , तुळजापूर- पंढरपूर -अक्कलकोट दर्शन, ज्योतिर्लिंग दर्शन, त्रंबकेश्वर -नाशिक दर्शन अशा धार्मिक सहलींचे आयोजन करावे. तथापि,या उपक्रमाची सुरुवात येत्या श्रावण महिन्यापासून करण्यात यावी अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!