महाराष्ट्रमुंबई

“राष्ट्रपती महोदया, आम्हाला एक खून करण्याची परवानगी द्या…” – राष्ट्रवादी नेत्या रोहिणी खडसे यांची मागणी

मुंबई प्रतिनिधी : जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्तीचा गौरव केला जात असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी एक धक्कादायक मागणी केली आहे. “आम्हाला एक खून करण्याची परवानगी द्या,” अशी थेट मागणी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात एक पत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले असून, देशातील महिलांच्या वाढत्या असुरक्षिततेबाबत संताप व्यक्त केला आहे.

महिलांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात संतप्त मागणी
खडसे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधी यांचा देश म्हणून भारताची ओळख आहे. हा अहिंसेचा देश आहे, याची मला जाणीव आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे आम्ही ही मागणी करत आहोत. महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. नुकतीच मुंबईत एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली. या घटनेने आम्हाला सुन्न केले आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत भारताची स्थिती अत्यंत वाईट आहे.”

“आम्हाला खून करायचा आहे अत्याचाराच्या मानसिकतेचा”
खडसे पुढे म्हणतात, “नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू सर्व्हेनुसार भारत हा महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश ठरला आहे. अपहरण, घरगुती हिंसाचार, महिलांचा छळ यासारख्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही महिलांना एक खून माफ करण्याची संधी द्यावी, अशी मागणी करीत आहोत. आम्हाला अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा आणि निष्क्रिय कायदा-सुव्यवस्थेचा खून करायचा आहे.”

“महिला सुधारण्यासाठी मागे राहणार नाहीत”
रोहिणी खडसे यांनी ऐतिहासिक महिलांचा संदर्भ देत म्हटले आहे, “महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाच्या रक्षणासाठी तलवार उपसली होती. मग आम्ही का मागे राहावे? महिलांचे रक्षण आणि समाज सुधारण्यासाठी कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे.”

“हीच जागतिक महिला दिनाची खरी भेट”
खडसे यांनी राष्ट्रपतींकडे आपल्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याची विनंती केली आहे. “आपण आमच्या मागणीचा विचार करून आम्हाला जागतिक महिला दिनाची खरी भेट द्यावी,” असे त्यांनी आपल्या पत्राच्या शेवटी नमूद केले आहे. त्यांच्या या पत्रावर आता विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, महिला सुरक्षेबाबत पुन्हा एकदा तीव्र आवाज उठला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!