महाराष्ट्रमुंबईशैक्षणिक

विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाचा निकाल रखडला; विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली!

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने २ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाचा निकाल १७ जून रोजी जाहीर करण्यात येणार होता. मात्र संभाव्य तारीख उलटली तरी अद्याप निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाचा निकाल कधी लागणार, प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार असे अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांसमोर निर्माण झाले आहेत. विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २ व ३ मे रोजी घेण्यात आली होती.

परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५७ हजार २९५ विद्यार्थ्यांना २ मे रोजी होणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र देण्यात आले होते. तीन सत्रांमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेला ५७ हजार २९५ विद्यार्थ्यांपैकी ४५ हजार ३१५ विद्यार्थी उपस्थित होते. सकाळच्या सत्रात १४ हजार ६८० विद्यार्थी, दुपारच्या सत्रात १५ हजार २६९ आणि तिसऱ्या सत्रात १५ हजार ३६६ विद्यार्थी उपस्थित होते. तसेच ३ मे रोजी सकाळच्या सत्रात १८ हजार ६९५ पैकी १४ हजार ५५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर दुपारच्या सत्रात नोंदणी केलेल्या १८ हजार ५१७ पैकी १४ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अशी २९ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

विधि तीन वर्ष सीईटी परीक्षेसाठी ९४ हजार ५०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७४ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेसाठी राज्यभरातून नोंदणी केलेल्यांपैकी ७८.९६ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने २ जून रोजी जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार या परीक्षेचा निकाल १७ जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र संभाव्य तारीख उलटून गेली तरी अद्याप विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मागील शैक्षणिक वर्षात २१ हजार ७१ जागा उपलब्ध होत्या. यापैकी २० हजार ३७१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यंदा या जागांमध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची पर्यायाने विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठी चुरस लागण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!