मंत्री अॅड. आशिष शेलार यांची एशियन क्रिकेट कौन्सिलच्या डायरेक्टर बोर्डात नियुक्ती बीसीसीआयची मोठी घोषणा

मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार आणि काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांची आज एशियन क्रिकेट कौन्सिलच्या (ACC) डायरेक्टर बोर्डात सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ही मोठी घोषणा केली असून, एशियन क्रिकेट कौन्सिलमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला मिळालेला हा बहुमान आहे.
एशियन क्रिकेट कौन्सिलचा विस्तार आणि भूमिका
एशियन क्रिकेट कौन्सिल ही आशिया खंडातील क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आली असून, यामध्ये भारत, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, मलेशिया आणि सिंगापूर या देशांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या अफगाणिस्तान, युएई, नेपाळ, ओमान, जपान, इराण आणि चीन यांच्यासह एकूण ३० देश या कौन्सिलचे सदस्य आहेत.
या कौन्सिलतर्फे नवीन खेळाडू घडवणे, त्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देणे, पंचांना मार्गदर्शन करणे आणि संपूर्ण आशियाई क्रिकेट क्षेत्राचा विकास करणे या उद्देशाने काम केले जाते. १९ वर्षांखालील आशिया कप, महिला आशिया कप आणि पुरुष आशिया कप यांसारख्या १३ हून अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन एशियन क्रिकेट कौन्सिलमार्फत केले जाते. त्यामुळे या कौन्सिलचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे महत्त्व आहे.
अॅड. आशिष शेलार यांचा क्रिकेटमधील प्रवास
बीसीसीआयने आज त्यांच्या डायरेक्टर बोर्डाच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. यापूर्वी अॅड. आशिष शेलार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, अध्यक्ष आणि बीसीसीआयचे खजिनदार म्हणूनही काम पाहिले आहे.
राज्याच्या मंत्रीपदावर नियुक्तीनंतर त्यांनी लोढा कमिटीच्या शिफारशीनुसार बीसीसीआयच्या खजिनदार पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, क्रिकेट क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि कामगिरी पाहता त्यांना आता एशियन क्रिकेट कौन्सिलच्या डायरेक्टर बोर्डावर नियुक्त करण्यात आले आहे.
क्रिकेटसाठी असलेली शेलार यांची तळमळ
मध्यवर्गीय कुटुंबातून आलेले अॅड. आशिष शेलार हे क्रिकेटप्रेमी असून, खेळाडूंप्रती त्यांची तळमळ मोठी आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी खेळाडूंना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
एशियन क्रिकेट कौन्सिलमधील महाराष्ट्राचा सन्मान
शेलार यांची एशियन क्रिकेट कौन्सिलच्या डायरेक्टर बोर्डावर नियुक्ती झाल्याने महाराष्ट्राच्या क्रिकेट क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे. क्रिकेटच्या विकासासाठी आणि नवीन खेळाडूंना संधी मिळवून देण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.