महाराष्ट्र

बँकिंग व्यवहाराबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यात नागरी सहकारी बँकांची भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा रौप्य महोत्सव उत्साहात

नागपूर : नागरी सहकारी बँकांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्र व गुजरात राज्यात असून या बँकांनी राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. यासोबतच सर्वसामान्य नागरिकांमध्ये बँकिंग व्यवहाराबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यातही नागरी सहकारी बँकांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.

येथील वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार सागर मेघे, पगारिया ग्रुपचे अध्यक्ष उज्वल पगारिया, वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अनिल पारख, उपाध्यक्ष अश्विन शाह मंचावर उपस्थित होते.

बहुतांश व्यावसायिक बँका गुंतवणुकीसह इतर बाबींमध्ये अग्रेसर असतात परंतु, देशाच्या आर्थिक विकासासाठी विविध प्राधान्यशील क्षेत्रात (प्रायॉरिटी सेक्टर) करण्यात येणाऱ्या कर्जपुरवठ्यात त्या मागे असतात, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, वर्धमान बँक स्थापनेपासूनच विविध निर्देशांक आणि मानकांच्या कसोटीवर उत्कृष्ट कार्य पार पाडत आहे. विशेषतः प्राधान्यशील क्षेत्रात प्रमाणावर कर्ज वाटप करूनही शून्य टक्के एनपीए असणाऱ्या  व सातत्याने 15 टक्के लाभांश देणाऱ्या या बँकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

वित्तीय संस्थांचे देशाच्या विकासात मोठे योगदान असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जास्तीत जास्त वित्तीय संस्था स्थापित झालेल्या प्रदेशाची आर्थिक आणि भौतिक प्रगती जोमाने होते. या संस्था प्रगतीच्या मानक आणि विकासाच्या भागीदार ठरतात. या दृष्टीने वर्धमान बँकेने व्यावसायिकता जोपासतानाच कौशल्यपूर्ण कामकाजातून व्यावहारिकता सांभाळत चांगली वित्तीय व्यवस्था उभी केली. कर्जपुरवठ्याला प्राधान्य दिल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून बँकेचीही प्रगती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

बँकिंग क्षेत्रात यापूर्वी मोठे बदल झाले तसेच काही नवी धोरणेही लागू झाली. मात्र, अशा परिस्थितीतही आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करून सहकारी बँकांनी व्यावसायिकतेचा अवलंब करत नवीन परिस्थितीत स्वतःला स्थापित केले. व्यावसायिक व राष्ट्रीय बँकांनादेखील ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी निर्माण झालेले तंत्रज्ञान स्वीकारण्यास अवधी लागला. मात्र, त्या सर्व बाबी अर्बन बँकांनी गतीने स्वीकारून ग्राहककेंद्रित सेवा देण्यासाठी सर्व सुविधांची निर्मिती करण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला आहे. वर्धमान बँक केवळ बँकिंग क्षेत्रापुरती मर्यादित न राहता सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी पार पाडत असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्धमान बँकेच्या स्थापनेबाबतची आठवण यावेळी विषद केली. 1999 मध्ये वर्धमान बँकेची स्थापना झाली व त्याच वर्षी ते विधानसभेत निवडून आले. बँकेची कारकीर्द आणि आपला विधिमंडळातील प्रवास या दोन्ही बाबींचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याचे सांगताना या संस्मरणीय घटनेबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. वर्धमान म्हणजे वर्धिष्णू होणे किंवा समृद्ध होत जाणे. या बँकेच्या संचालक मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांची अचूक निर्णय क्षमता व त्यांनी दाखवलेल्या व्यावसायिक कौशल्यामुळे हे नाव सार्थक झाले असल्याचे ते म्हणाले. बँकेची तत्व व व्यावहारिक निकषांचे पालन करत इतर सहकारी बँकाही उत्कृष्ट कामगिरी करून योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात वर्धमान बँकेने अधिकाधिक उद्दिष्ट पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी बँकेच्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.

राज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र सहकार विभागाची निर्मिती केली ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असल्याचे सांगितले. वर्धा व नागपूर या जिल्हा बँकांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रयत्नातून पुनरुज्जीवन झाल्याने मोठी मदत झाल्याचे ते म्हणाले. राज्य सहकारी बँकेने ग्राहकांची सायबर क्राईमच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी स्थापन केलेल्या केंद्राच्या मदतीने राज्यातील इतर जिल्हा बँकांनाही या संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असून सहकारातून समृद्धी साधली जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माजी खासदार अजय संचेती यांनी उत्तम व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून बँकेने केलेल्या वाटचालीबद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बँकेचे संचालक अनिल पारख यांनी बँकिंग संबंधातील सर्व सुविधा ग्राहकांना वेळोवेळी पुरवण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले. बँकेच्या विविध शाखांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

माजी आमदार सागर मेघे, उज्वल पगारिया यांनी बँकेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा प्रवास व संक्षिप्त परिचय चित्रफितीच्या माध्यमातून सादर करण्यात आला. बँकेला प्रगतीपथावर नेण्यात विशेष योगदान देणारे संचालक मंडळातील विविध पदाधिकारी व सदस्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके उपस्थित होते. यावेळी संचालक मंडळातील अतुल कोटेचा, दिलीप रांका, राजन धाड्डा, हितेश संकलेचा, हेमंत लोढा, आशिष दोशी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!