मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ची स्थापना

गरजू रुग्ण आणि आपत्तीग्रस्तांना मदतीचा नवा आधार; मुख्यमंत्री सहायता निधीला मिळणार सामाजिक सहभागाचे बळ

मुंबई, दि. ३ : राज्यातील दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती तसेच अन्य संकटांमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत करण्यासोबतच आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी अधिक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे मुख्यमंत्री सहायता निधीला सामाजिक सहभागाच्या माध्यमातून अतिरिक्त आर्थिक बळ मिळणार आहे.

कंपन्या, सामाजिक संस्था, देणगीदार आणि दानशूर व्यक्ती यांच्या सहकार्यातून या सोसायटीच्या माध्यमातून अतिरिक्त निधी उभारण्यात येणार आहे. हा निधी गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी तसेच विविध नैसर्गिक आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये बाधित नागरिकांना मदत करण्यासाठी वापरला जाणार आहे.

हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंडविकार आणि मेंदूविकार यांसारख्या गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया, महागडे उपचार आणि दीर्घकालीन वैद्यकीय सेवांसाठी या माध्यमातून अधिक आर्थिक मदत उपलब्ध करून देता येणार आहे. याशिवाय आवश्यक औषधे, वैद्यकीय साहित्य आणि उपचारांशी संबंधित इतर खर्चासाठीही सहाय्य करता येणार आहे. दुर्मिळ आजारांवरील उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध करण्याची सुविधाही या उपक्रमातून निर्माण होणार आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णांच्या उपचारांसाठी सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून अतिरिक्त निधी उभारण्याच्या पर्यायांचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून रुग्णालये, स्वयंसेवी संस्था, कंपन्या आणि विविध सामाजिक संस्थांना एकत्र आणून गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय मदतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

केवळ वैद्यकीय उपचारांपुरतेच या सोसायटीचे कार्य मर्यादित राहणार नसून आपत्तीग्रस्त व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण, दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थांना आर्थिक सहाय्य आणि सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन यांसारखे उपक्रमही राबविता येणार आहेत. तसेच आरोग्यविषयक जनजागृती, चर्चासत्रे, कार्यशाळा आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

राज्यात दुष्काळ किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास सामाजिक संस्थांच्या सहकार्याने बाधित नागरिकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी या सोसायटीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतील. लोकसहभागातून अधिक संसाधने उपलब्ध करून गरजू आणि संकटग्रस्त नागरिकांना वेळेवर मदत मिळवून देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे गरजू रुग्ण आणि आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी मदतीचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. कंपन्या, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या योगदानातून मदतीची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमात अधिकाधिक दात्यांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!