ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते निवासस्थानी गौरव
मुंबई – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे जनसंपर्क अधिकारी तथा ‘स्टार महाराष्ट्र’चे संपादक हेमंत रणपिसे यांनी साप्ताहिकाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर केला होता. नुकतीच योगेश त्रिवेदी यांच्यावर एंजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली असून त्यांच्यावर तीन स्टेंट बसवण्यात आले आहेत.
त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्रिवेदी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी आठवले यांच्या हस्ते योगेश त्रिवेदी यांना ‘स्टार महाराष्ट्र’चा प्रतिष्ठित राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी संपादक हेमंत रणपिसे आणि ज्येष्ठ पत्रकार भारत कदम उपस्थित होते. या भेटीदरम्यान योगेश त्रिवेदी यांनी आठवले यांना ‘पासष्टायन’, ‘गुरुजी’ आणि ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य लिखित ‘आठवणीतले प्रबोधनकार’ ही पुस्तके भेट दिली.




