सोशल सर्व्हिस लीग रात्रशाळेचे शिक्षक विजय सावंत यांच्या ‘धाकावयले कावळे’ कथासंग्रहाचे प्रकाशन

प्रा. हेमंत सामंत यांच्या हस्ते प्रकाशन; वाचन प्रेरणा दिनानिमित्त साहित्यिक उपक्रमाचे आयोजन
मुंबई, दि. २३ ऑक्टोबर :
सोशल सर्व्हिस लीग रात्रशाळेत भारताचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या ‘वाचन प्रेरणा दिना’चे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात रात्रशाळेतील शिक्षक आणि लेखक विजय सावंत यांच्या ग्रामीण जीवनाचे चित्रण करणाऱ्या ‘धाकावयले कावळे’ या कथासंग्रहाचे प्रकाशन प्रा. हेमंत सामंत, मुख्याध्यापिका श्रेया नाईक आणि मुंबई महानगरपालिकेतील ज्येष्ठ अभियंते व विजय सावंत यांचे बालमित्र संतोष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
विजय सावंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल गावचे सुपुत्र असून व्यवसायाने शिक्षक आहेत. त्यांनी एस.सी.ई.आर.टी., पुणे तसेच एम.ई.पी.ए. आणि आर.ए.ए. या संस्थांशी संबंधित विविध शैक्षणिक उपक्रमांत सहभाग घेतला आहे. औरंगाबाद, नाशिक यांसह विविध ठिकाणी त्यांनी राज्यस्तरावर इंग्रजी आणि इतर विषयांसाठी काम केले आहे. पाठ्यपुस्तकांमधील क्यूआर कोड तयार करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल शिक्षणमंत्र्यांकडून त्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सावंत यांचे ‘प्रकाश किरणाच्या शोधात’ आणि ‘जगण्याचे आर्त’ हे दोन कवितासंग्रह यापूर्वी प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या साहित्यिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना एकता कल्चरल अकादमी, मुंबई यांचा ‘महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार’, अहिल्या शिक्षण संस्थेचा ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’, लक्ष्मी शिक्षण संस्थेतर्फे ‘साने गुरुजी पुरस्कार’ तसेच लायन्स इंटरनॅशनल क्लबचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.
या वेळी बोलताना प्रा. हेमंत सामंत म्हणाले की, सोशल सर्व्हिस लीग शाळेला शंभर वर्षांहून अधिक काळाचा समृद्ध शैक्षणिक वारसा लाभला आहे. या संस्थेतून अनेक थोर साहित्यिक घडले आहेत. नव्या पिढीतील उपक्रमशील शिक्षक म्हणून विजय सावंत यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या साहित्यनिर्मितीमुळे या परंपरेत नवी भर पडली आहे.
‘धाकावयले कावळे’ या कथासंग्रहाविषयी विचार मांडताना प्रा. सामंत यांनी वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना हा कथासंग्रह अर्पण केल्याबद्दल विजय सावंत यांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राहून जगताप आणि इतर शिक्षकांनी मेहनत घेतली. अमोल नलावडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि उपस्थितांचे आभार मानले.


