*वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेची भन्नाट ऑफर: भाजपचं ओळखपत्र दाखवा आणि एक लिटर पेट्रोल मोफत मिळवा!*
सिंधुदुर्गात शिवसेना भाजप आमनेसामने..
कुडाळ:शाब्दिक आरोप-प्रत्यारोप, वाद आणि राडे करुन झाल्यानंतर आता सिंधुदुर्गात शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या वर्धापनदिनी येथील आमदार वैभव नाईक यांनी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करुन भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापनदिन आहे. यानिमित्ताने आमदार वैभव नाईक यांनी स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलबरोबरच घरगुती गॅस सिलेंडरचे दर मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. अनेक जिल्ह्यात पेट्रोलचे दर शंभर पार गेले आहेत. आधीच कोरोनाच्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांना आता दरवाढीचा बोजाही सहन करावा लागत आहे. या पार्श्व्भूमीवर सर्वसामान्य नागरिकांना १०० रुपयांत २ लिटर पेट्रोल (प्रति वाहन) देण्यात येणार आहे.तर भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी १ लीटर पेट्रोलचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. वैभव नाईक यांच्या या उपक्रमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. यावरुन शिवसेना आणि भाजप समर्थकांमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे.