स्वरांकुर संगीत विद्यालयाचा अनोखा उपक्रम; ‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले’ या दोन मराठी गीतांचे दिमाखात लोकार्पण

“या उपक्रमाने अन्य संगीत विद्यालयांसमोर एक आदर्श निर्माण केला” – संगीतकार कौशल इनामदार

मुंबई : बोरीवली येथील स्वरांकुर संगीत विद्यालयाच्या वतीने ‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले’ या दोन मराठी गीतांचे लोकार्पण ११ ऑक्टोबर रोजी अंधेरी येथील वेदा कुणबा सभागृहात सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या अनोख्या उपक्रमातून स्त्रीशक्तीचा जागर आणि स्वराज्याचे संस्कार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या कार्यक्रमात बोलताना कौशल इनामदार यांनी स्वरांकुर संगीत विद्यालयाच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. एवढ्या मोठ्या संख्येने गायक कलाकारांना आजीवासनसारख्या नामांकित स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रण करण्याची संधी मिळणे ही आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या उपक्रमाने इतर संगीत विद्यालयांसमोर एक आदर्श निर्माण केला असून, स्वरांकुर संगीत विद्यालयाने भविष्यातही असेच उपक्रम सुरू ठेवावेत, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

‘दुर्गा’ या गीतामध्ये ५८ महिलांनी सहभाग घेतला असून, हे गीत स्त्रीशक्ती, आत्मविश्वास आणि प्रत्येक स्त्रीच्या मनातील सामर्थ्याचा उत्सव साजरा करते. तर ‘शिवबाची मुले’ या गीतामध्ये ४१ बालगायक सहभागी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, स्वराज्याचे संस्कार आणि मावळ्यांची जिद्द यांना समर्पित असलेले हे एक प्रेरणादायी गीत आहे. या दोन्ही गीतांचे ध्वनिमुद्रण आजीवासन स्टुडिओज आणि यशराज स्टुडिओज येथे करण्यात आले.

या दोन्ही गीतांना सुप्रसिद्ध संगीतकार सिद्धांत करावडे यांनी संगीत दिले आहे. ‘दुर्गा’ या गीताचे लेखन केदार माईणकर यांनी केले असून, ‘शिवबाची मुले’ या गीताचे लेखन दीप्ती माईणकर आणि केदार माईणकर यांनी संयुक्तपणे केले आहे.

संगीताच्या माध्यमातून महिलांना स्वतःची अभिव्यक्ती करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि मुलांमध्ये प्रेरणादायी मूल्ये रुजवणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे स्वरांकुर संगीत विद्यालयाच्या संस्थापिका सायली सोमण माईणकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

२०१२ मध्ये केवळ एका विद्यार्थिनीसह सुरू झालेल्या स्वरांकुर संगीत विद्यालयाने यंदा यशस्वीपणे १४ वर्षे पूर्ण केली आहेत. आज या विद्यालयात सुमारे १५० विद्यार्थी-विद्यार्थिनी संगीताचे शिक्षण घेत आहेत. यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, काही परदेशी विद्यार्थीही या विद्यालयातून संगीताचे धडे घेत आहेत. गायनासोबतच पेटी आणि तबला यांसारख्या वाद्यांचे प्रशिक्षणही येथे दिले जाते.

सायली सोमण माईणकर यांनी हिंदुस्थानी संगीतात एम.ए. पदवी प्राप्त केली असून, त्यांना पंडित उत्तमराव अग्निहोत्री, मधुवंती पेठे आणि प्रख्यात शास्त्रीय गायिका अर्चना कान्हेरे यांसारख्या दिग्गज गुरूंचे मार्गदर्शन लाभले आहे. सध्या त्या सौ. सायली तळवलकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे पुढील शिक्षण घेत आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये रंगमंचावर सादरीकरण करण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी स्वरांकुर संगीत विद्यालयातर्फे नामांकित नाट्यगृहांमध्ये वार्षिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांसाठी मयूर सुकले, मधुवंती पेठे आणि मधुरा कुंभार यांसारख्या नामवंत व्यक्तींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

स्वरांकुर संगीत विद्यालयाच्या जडणघडणीत बोरीवली पश्चिम येथील जयराज नगरमधील ब्राह्मण सेवा संघाचे मोलाचे योगदान असल्याचे सायली सोमण माईणकर यांनी नमूद केले. या संस्थेने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत संस्थेचे आभार मानले.

‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले’ ही दोन्ही गाणी सध्या YouTube आणि Instagram या डिजिटल माध्यमांवर उपलब्ध आहेत. लवकरच ती सर्व प्रमुख म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवरही ऐकण्यासाठी उपलब्ध होतील, अशी माहिती सायली सोमण माईणकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!