सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अणुशक्तीनगरमध्ये ‘युवाज २०२६’ महारोजगार मेळावा

आमदार सना मलिक-शेख यांचा पुढाकार; १८ ऑक्टोबर रोजी नामांकित कंपन्यांकडून थेट मुलाखती

मुंबई, १३ ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात ‘युवाज २०२६’ या भव्य युवा महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सना मलिक-शेख यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत असून, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी अणुशक्तीनगर मतदारसंघात उभारलेली विकासकामे, जनसेवा आणि संघर्षाची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न आमदार सना मलिक-शेख करत आहेत. याच भूमिकेतून स्थानिक सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी या महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

‘आंदोलनही, प्रगतीही आणि आता नोकरीची वेळही!’ या संकल्पनेतून तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नामांकित कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची आणि रोजगार मिळविण्याची संधी मिळणार आहे.

हा महारोजगार मेळावा रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मानखुर्द (पूर्व) येथील सायन-पनवेल महामार्गालगत, अणुशक्तीनगर सिग्नलजवळील मातोश्री विद्यामंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदविकाधारक तसेच पदवीधर उमेदवारांसाठी नामांकित कंपन्यांकडून थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. याशिवाय, उमेदवारांना करिअरविषयक समुपदेशन आणि मार्गदर्शन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा (CV) सोबत आणावा आणि www.sanamalikshaikh.in/yuvaaz या संकेतस्थळावर विनामूल्य नोंदणी करावी, असे आवाहन आमदार सना मलिक-शेख यांनी केले आहे.

सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तरुणांच्या भविष्याला नवी दिशा देणारा हा उपक्रम राबवून जनसेवेचा वारसा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार सना मलिक-शेख यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!