महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू

आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेला यश; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पणजी येथे लोकार्पण

पणजी : महाराष्ट्रातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांसाठी उपयुक्त ठरलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धर्तीवर आता गोवा राज्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू करण्यात आला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पणजी येथे या कक्षाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला योजनेचे मूळ संकल्पक आणि आरोग्यदूत मंगेश चिवटे यांची विशेष उपस्थिती होती.

या उपक्रमामुळे गोव्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना उपचारांसाठी आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी १७ मार्च २०१५ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू करण्याची संकल्पना मांडली होती. महाराष्ट्रात या योजनेला मिळालेल्या यशानंतर इतर राज्यांमध्येही अशा प्रकारची योजना सुरू व्हावी, यासाठी चिवटे प्रयत्नशील होते.

याच अनुषंगाने काही महिन्यांपूर्वी त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन गोव्यात वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्री सावंत यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर गोवा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या उपक्रमाला मंजुरी देण्यात आली आणि आता या संकल्पनेचे प्रत्यक्षात रूपांतर झाले आहे.

लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मंगेश चिवटे यांच्यातर्फे गोवा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाला एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. गोव्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी, या सामाजिक बांधिलकीतून हा धनादेश देण्यात आला.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळाली आहे. याच यशस्वी उपक्रमाच्या धर्तीवर गोव्यातही स्वतंत्र कक्ष सुरू झाल्याने आर्थिक अडचणींमुळे उपचार घेण्यात अडथळे येणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

या सोहळ्यास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे मूळ संकल्पक मंगेश चिवटे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.

महाराष्ट्रात सुरू झालेली गरजू रुग्णांच्या सेवाभावाची संकल्पना आता गोव्यातही साकार झाली आहे. या उपक्रमामुळे गोव्यातील अनेक रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदतीची नवी आशा मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!